बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. बाबासाहेबांचं आजपर्यंतचे कार्य मोठं असून त्याबाबत प्रश्न उपस्थित करता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे सर्व आक्षेप फेटाळून लावले. तसेच याचिकाकर्त्यांनी केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल त्यांना दहा हजारांचा दंडदेखील ठोठावण्यात आला. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती शुक्रे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. ही याचिका राज्य सरकारच्या अध्यादेशाला धरून असली तरी त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरेंना वैयक्तिकरित्या विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून विचार केल्यास बाबासाहेबांचे कार्य निश्चितच मोठे आहे. त्यांनी आयुष्याची ४०-५० वर्षे शिवकालीन अभ्यासासाठी खर्ची घातली आहेत. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय सभांमध्ये व्याख्याने दिली आहेत, लिखाण केले आहे. तरीही तुमचे म्हणणे आहे का की ते पुरस्काराचे निकष पूर्ण करत नाहीत, असा सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. यावेळी बाबासाहेब पुरंदरे आणि राज्य सरकारच्या वकिलांनी याचिकाकर्ते न्यायालयाचा अमूल्य वेळ फुकट घालवत असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने निकाल देताना दाखल करण्यात आलेल्या याचिकेत कोणताही अर्थ नसल्याचे सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्यामुळे राजभवनात आयोजित करण्यात आलेला आजचा पुरस्कार वितरण सोहळा कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बाबासाहेब पुरंदरेंना हा पुरस्कार जाहीर करताना राज्य सरकारने पुरस्कारासाठीचे निकष डावलल्याचा आरोप करत पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. पुरस्काराबाबत १ सप्टेंबर २०१२ च्या अध्यादेशाचे पालन करण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला होत. पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तीने ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने किमान २० वर्षे विशेष आणि उल्लेखनीय काम करणे अध्यादेशानुसार बंधनकारक आहे. शिवाय त्या व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे व ‘पद्म’ पुरस्कारप्राप्त मान्यवरांना त्यात प्राधान्य देण्याचाही निकष आहे, परंतु बाबासाहेब यापैकी एकाही निकषात बसत नाहीत, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. राज्य सरकारने या पुरस्कारासाठी डॉ. प्रकाश आमटे, डॉ. रवींद्र आणि सीमा कोल्हे, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, आशा भोसले, राजदत्त, हिम्मतराव बाविस्कर, बाबा कल्याणी यांच्या नावाचा विचारही केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 19th Aug 2015 रोजी प्रकाशित
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराविरोधातील याचिका फेटाळली; १० हजारांचा दंड ठोठावला
बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
First published on: 19-08-2015 at 12:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai high court dismissed the plea of maharashtra bhushan award