भारतातील कोणताही कार्यक्रम दिलेल्या वेळेपेक्षा उशिरानेच सुरू होतो, असा एक विनोद नेहमी केला जातो. त्यावरून ‘इंडियन स्टॅण्डर्ड टाइम’ असा नवा शब्दप्रयोगही तयार झाला आहे. हा शब्दप्रयोग नव्या कोऱ्या टर्मिनल-२वर उतरणाऱ्या पहिल्यावहिल्या विमानाबाबतही करावा लागला. नव्या टर्मिनल-२वर बुधवारी दुपारी एक वाजता उतरणारे एअर इंडियाचे विमान तब्बल २० मिनिटे उशिरा उतरले. या नव्या टर्मिनलवर उतरणारे हे पहिलेच विमान असल्याने दोन्ही बाजूंनी पाण्याचे फवारे मारून या विमानाचे स्वागत करण्यात आले. हे विमान उशिराने उतरल्यामुळे नव्या टर्मिनलवरून पहिल्यांदाच उड्डाण करणारे जेट एअरवेजचे विमानही पाच मिनिटे उशिरानेच आकाशात झेपावले.
सिंगापूरहून चेन्नईमार्गे येणारे एअर इंडियाचे ३४३ हे विमान टर्मिनल-२ वर उतरणारे पहिले विमान होते. हे विमान वेळापत्रकानुसार दुपारी एक वाजता उतरणे अपेक्षित होते. मात्र या विमानाला २० मिनिटे उशीर झाला. पण हे विमान दृिष्टपथात आल्यानंतर टर्मिनल-२च्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसत होता. विमान जमिनीवर उतरल्यानंतर दोन्ही बाजूंनी पाण्याचे फवारे मारत या विमानाला सलामी देऊन टर्मिनल-२चे खऱ्या अर्थाने उद्घाटन झाले.
या विमानाने आलेल्या प्रवाशांना टिळा लावून गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर टर्मिनलच्या आगमनद्वारावर नाशिक ढोल आणि तुतारी यांच्या गजरात या प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. हे विमान उतरल्यानंतर पाचच मिनिटांनी लंडनकडे जाणारे जेट एअरवेजचे विमान आकाशात झेपावले. हे विमान आकाशात झेपावल्यावर ३५ मिनिटांनी म्हणजेच दुपारी दोनच्या सुमारास जुन्या टर्मिनल-२वरील सर्वच कार्यवाही ठप्प केली गेली.