सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला असून नव्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या परीक्षेत मुंबईकर मुलींनी बाजी मारली आहे. मुंबई येथील कोमल जैन ही देशात पहिली, तर राजवी नाथवानी ही तिसरी आली आहे. दुसरा क्रमांक सुरत येथील मुदीत अगरवाल याने पटकावला आहे. या परीक्षेच्या माध्यमातून नव्या अभ्यासक्रमाच्या पाच हजार ३९२ विद्यार्थ्यांना, तर जुन्या अभ्यासक्रमानुसार पाच हजार ६७५ विद्यार्थ्यांना सनद देण्यात आली आहे.

‘इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’च्या वतीने नोव्हेंबर २०२० मध्ये जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत पहिल्या आलेल्या कोमल जैन हिला ८०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत. दुसऱ्या आलेल्या मुदीत अगरवाल याला ५८९ गुण, तर तिसऱ्या स्थानी असलेल्या राजवी नाथवानी हिला ५८७ गुण मिळाले आहेत.

जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत सालेम येथील इसाकीराज ए (५५३ गुण) हा प्रथम आला आहे. चेन्नई येथील श्रीप्रिया आर. (५०१ गुण) दुसरी, तर जयपूर येथील मयांक सिंग (४८९ गुण) तिसरा आला आहे.

दृष्टिक्षेपात निकाल..

* नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेसाठी पहिल्या विषय गटाच्या (ग्रुप १) परीक्षेला ३२ हजार ५४२ विद्यार्थी बसले होते, त्यातील चार हजार १७९  विद्यार्थी (१२.८४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.

* दुसऱ्या विषय गटाच्या (ग्रुप २) परीक्षेला २७ हजार ९०७ विद्यार्थी बसले असून त्यातील आठ हजार  ६४३ विद्यार्थी (३०.९७ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही विषय गटांची परीक्षा १९ हजार २८४ विद्यर्थ्यांनी दिली असून  त्यातील दोन हजार ७९० (१४.४७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* जुन्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या विषय गटाची (ग्रुप १) परीक्षा १२ हजार २६ विद्यार्थी बसले होते. त्यातील दोन हजार १४५ विद्यार्थी (१७.८४ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या विषय गटाची (ग्रुप २) परीक्षा १७ हजार १३२ विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील पाच हजार ४४२ विद्यार्थी (३१.७७ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही विषय गटांची परीक्षा चार हजार १४३ विद्यार्थ्यांनी दिली असून त्यातील २४२ (५.८४ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.