घाटकोपर रेल्वे स्थानकात लोकल ट्रेन पकडण्याच्या नादात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे (१६) या तरुणीवर केईएम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागात उपचार सुरू आहेत. ‘मला घरी जायचे आहे, मी बरी होईन ना,’ असा सवाल ती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे करत आहे.
 कुर्ला नेहरूनगर येथे राहणारी मोनिका शनिवारी दुपारी घाटकोपर रेल्वे स्थानकात लोकल ट्रेन पकडताना हात घसरून खाली पडली होती. तिला सुरुवातीला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते. नंतर तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोठय़ा प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अवयव तुटलेल्या रुग्णांवर हाडांची जुळवाजुळव करण्यासाठी ठरावीक कालावधीत शस्त्रक्रिया करावी लागते. पण मोनिकाला आणण्यासाठी उशीर झाला होता, अशी माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांनी दिली. या घटनेनंतर तिला जबर मानसिक धक्का बसला असल्याने तिचे समुपदेशन सुरू असल्याची माहितीही पारकर यांनी दिली. तिच्या प्रकृतीचा धोका टळला असला तरी तिने दोन्ही हात गमावले आहेत. मला लवकर घरी जायचे आहे, मी ठीक होईन ना, असे ती डॉक्टरांना विचारत आहे.
रेल्वे प्रशासन जबाबदारी घेणार का?
घाटकोपर स्थानकात घडलेला हा प्रसंग दुर्दैवी होता. रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या अपघातासाठी मोनिकाच जबाबदार आहे. मात्र या अपघातात प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातील गरजेपेक्षा जास्त अंतराचा फटकाही बसला आहे. आतापर्यंत या पोकळीत अनेकांनी जीव गमावला आहे. मोनिका केवळ १६ वर्षांची तरुणी आहे. तिच्यापुढे सर्व आयुष्य आहे. रेल्वेने या अपघाताची जबाबदारी घेत मोनिकाला नुकसान-भरपाई द्यायलाच हवी.
लता अरगडे, महिला प्रतिनिधी, प्रवासी महासंघ