मुंबई : ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’द्वारे सोमवारी कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ‘मेट्रो-३’च्या सीएसआयए टी-१ स्थानक येथे भुयारीकरणाचा ३१वा टप्पा पार पडला. पॅकेज-६ च्या टेराटेक निर्मित तापी-१ या टनेल बोअरिंग मशीनद्वारे सहार ते सीएसआयए टी-१(आंतरदेशीय विमानतळ ) पर्यंतचे १.५ किमी अंतर ४४९ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले. यासाठी एकूण १०८० रिंग्सचा वापर करण्यात आला.

‘सीएसआयए टी-१ हे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरून दररोज एक लाखापेक्षा अधिक प्रवासी प्रवास करणे अपेक्षित आहे. सीएसआयए टी-१ स्थानक आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळांना जोडले जाणार आहे व त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची कोंडी कमी होण्यास मदत होईल,’ असे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले.

सीएसआयए टी-१ स्थानकाचे एकूण ५५टक्के  काम पूर्ण झाले आहे. सीएसआयए टी-१ (आंतरदेशीय विमानतळ), सीएसआयए टी-२ (आंतरराष्ट्रीय विमानतळ) व सहार रोड स्थानकांचा समावेश असलेल्या पॅकेज-६ चे एकूण ८५टक्के  भुयारीकरण पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ८७टक्के  भुयारीकरण व ६०टक्के  बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या एकूण ७ टीबीएमद्वारे विविध भागात भुयारीकरण सुरू असून येत्या काही महिन्यात आणखी काही भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण होणे अपेक्षित आहे.