खड्डेमय रस्त्यांमुळे मुंबईकर त्रस्त असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. खड्डे बुजविण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवार) घाटकोपर येथे अंतराळवीरांसारखा पोशाख परिधान करून आंदोलन केले.

मुंबईतील बहुसंख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी, ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असून मुंबई महानगरपालिकेने अद्यापही अनेक रस्त्यांवरील खड्डे बुजविलेले नाहीत. परिणामी, मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र महानगरपालिकेचे अधिकारी याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

दोन दिवसात सर्व रस्त्यांवरील खड्डे भरावेत –

मुंबईतील खड्डेमय रस्त्यांवरून चालताना अंतराळात गेल्याच भास होत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी अंतराळवीरांसारखा पोशाख परिधान करून आज पंतनगर परिसरात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. मुंबई महानगरपालिकेने दोन दिवसात सर्व रस्त्यांवरील खड्डे भरावेत, अशी मागणी यावेळी आंदोलकर्त्यांनी केली.