प्रसाद रावकर prasadraokar@gmail.com

आकाशात स्वच्छंदीपणे विहरणाऱ्या कबुतरांना शांततेचे प्रतीक मानले जाते. अनेक जण भूतदया म्हणून त्यांना नित्यनेमाने दाणे घालतात. काही जणांना तर कबुतरे पाळण्याचाही छंद असतो. मात्र ज्या परिसरात असे कबुतरप्रेमी असतात, तेथील रहिवाशांना अस्वच्छता, आरोग्यावरील दुष्परिणाम अशा विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. अशा त्रासदायक कबुतरप्रेमींना अद्दल घडवण्यासाठी आता मुंबई महापालिकेने दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीविषयी शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

गेल्या काही वर्षांत मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतही कबुतरांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. छत, खिडक्यांचे ग्रिल, बाल्कनीतील कोपरे असे जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी घरटी केलेली दिसतात. त्यांच्या पंखांची फडफड, त्यांचा आवाज, सर्वत्र पसरलेली विष्ठा आणि पिसे यामुळे ही शांततेची प्रतीके नागरिकांची मोठीच डोकेदुखी बनू लागली आहे.

गाय, कुत्रा, मांजरांप्रमाणेच कबुतरांनाही भूतदया म्हणून चणे-दाणे खाऊ घालणाऱ्या मंडळींची संख्या मोठी आहे. या भूतदयेतूनच मुंबईत मोठय़ा संख्येने कबुतरखाने उभे राहिले आहेत. यापैकी बहुसंख्य कबुतरखाने अनधिकृत आहेत. आपला चरितार्थ चालावा या उद्देशाने कुणी तरी गोल रिंगण अथवा चौकोनी चबुतरा उभारून सुरुवातीला स्वत:च दाणे टाकून कबुतरांना आमंत्रण देतो. आयते खाद्य मिळाल्यामुळे हळूहळू नित्यनेमाने कबुतरे तिथे येऊ लागतात. आसपासच्या इमारतींच्या कानाकोपऱ्यात शिरकाव करून तिथेच ठाण मांडतात. रोज सकाळी देवदर्शनाला जाताना काही मंडळी न चुकता कबुतरखान्यात १०-२० रुपयांचे चणे-दाणे टाकून भूतदया दाखवतात. त्यामुळे पदरात पुण्य पाडते, असा त्यांचा समज असल्याचे दिसते. मात्र, पुण्य मिळवण्याच्या नादात ही मंडळी अस्वच्छतेला आमंत्रण देत असतात.

आयते आणि भरपेट दाणे खाल्ल्यानंतर कबुतरे आसपासच्या इमारतींत जातात आणि त्याचा प्रचंड त्रास या इमारतींमधील रहिवाशांना भोगावा लागतो. तर कबुतरखान्यालगत चणे-दाणे विकणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायमचा निकाली लागतो. असे प्रकार मुंबईत सर्रास सुरू आहेत आणि त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. कबुतरांची विष्ठा आणि त्यांच्या पंखांमधून पसरणारे जीवजंतू यामुळे श्वसनाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. मानवी आरोग्यासाठी कबुतरांचा वावर घातक ठरू लागला आहे. पण यावर तोडगा काढण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत.

कबुतरांच्या मुद्दय़ावरून अनेक वाद उद्भवू लागले आहेत. कबुतरप्रेमी विरुद्ध कबुतरविरोधी असे दोन गट निर्माण झाले आहेत. आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या कबुतरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. काही नागरिकांनी पालिकेकडे तक्रारीही केल्या आहेत. पण या तक्रारींचे निवारण अद्यापही झालेले नाही. सार्वजनिक ठिकाणी उभे असलेले कबुतरखाने हटवले जाऊ नयेत, याविषयी काही जण दुराग्रही आहेत. त्यामुळे नेमके काय करावे असा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला आहे.

पक्ष्यांना बाल्कनीत दाणे घातल्याने त्यांची विष्ठा आणि पिसांचा कचरा खालच्या मजल्यावर राहणाऱ्यांच्या बाल्कनीत पडतो. त्यामुळे बाल्कनीत पक्ष्यांना दाणे घालता येणार नाहीत, असे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पालिकेला जाग आली आहे. सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खाद्य घालणाऱ्यांविरुद्ध दंडाचा बडगा उगारण्याचा निर्णय पालिकेने घेतला. इतर नागरिकांना उपद्रव होईल अशा पद्धतीने प्राणीमात्रांवर भूतदया दाखविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार पालिकेच्या

घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात आले आहेत. मात्र यातही एक मेख आहे. केवळ कुणी तक्रार केली तरच ही कारवाई होणार आहे. पालिकेने तक्रार येण्याची वाट पाहू नये. कारवाई करण्यासाठी यंत्रणा उभी करावी, तरच मुंबईकरांची या त्रासातून सुटका होईल, असे अनेकांचे म्हणणे आहे.

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्राणीमात्रांवर भूतदया दाखवत अस्वच्छता करणाऱ्यांवर यापूर्वी कधी कारवाईचा बडगा उगारल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळेच रस्तोरस्ती फिरून कुत्र्या-मांजरांना रामप्रहरापासून खाद्य घालणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कबुतरांनाही चणे-दाणे घालणाऱ्यांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. अस्वच्छतेस कारण ठरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने क्लिन अप मार्शल तैनात केले आहेत. पण प्राणी-पक्ष्यांना खाद्य घालणाऱ्या किती जणांविरुद्ध क्लिन अप मार्शलने कारवाई केली हे गुलदस्त्यातच आहे.

ठाणे, नवी मुंबईतील रहिवासीदेखील कबुतरांमुळे त्रस्त झाले आहेत. तेथील अनेक निवासी संकुलांमध्ये कबुतरांना दाणे घालणाऱ्या रहिवाशांचा त्रास इतरांना सहन करावा लागत आहे. मुंबई महापालिकेने किमान तक्रार केल्यानंतर तरी ५०० रुपये दंड आकारण्याची तयारी दर्शवली आहे. कारवाई होताना मात्र दिसत नाही. त्याच वेळी कबुतरांच्या उपद्रवाबाबत ओरड करूनही ठाणे आणि नवी मुंबईतील पालिका थंडच आहे. त्यामुळे ही शांततेची प्रतीकेच आता उपद्रवी ठरू लागली आहेत.