कोपरी येथील साईनगरी भागात गुरुवारी रात्री गस्तीवर असलेल्या एका पोलीस शिपायावर एका संशयित तरुणाने हल्ला करून पळ काढला. या हल्ल्यात शिपायाच्या हाताला गंभीर जखम झाली असून, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले.कोपरी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विजय सकपाळ आणि के.बी. पाटील हे  गुरुवारी मध्यरात्री परिसरात गस्त घालत होते. चेंदणी कोळीवाडा येथील साईनगरी परिसरात त्यांनी तीन संशयित तरुणांना हटकले असता, त्या तरुणांनी पळ काढला. त्यामुळे या तरुणांना पकडण्यासाठी दोघेही धावले. दोन तरुण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तर त्यापैकी एक तरुण याच परिसरातील शौचालयाजवळ लपून बसला. विजय त्याच्याजवळ पोहचताच त्याने त्यांच्या दिशेने एक हत्यार उगारले. त्यावेळी बचाव करताना त्यांच्या हाताला दुखापत झाली. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखाराचा शोध घेत आहेत.

हवाई दलाच्या अधिकाऱ्याचे धाडस; दरोडेखोरास पकडले
मुंबई : शीव येथील क्रोमा शोरूमवर दरोडा घातला जात असताना हवाईदलाच्या एका अधिकाऱ्याने जीव धोक्यात घालून एका दरोडेखोरास पकडले. रतनकुमार शर्मा (५५) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. या झटापटीत ते जखमी झाले असून त्यांच्यावर नौदलाच्या आयएनएस अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रतनकुमार हे शुक्रवारी सकाळी मॉर्निग वॉकसाठी गेले असता तेथील क्रोमा शोरूममध्ये पाच जण दरोडा घालण्यासाठी आले होते. क्रोमाच्या सुरक्षा रक्षकाशी त्यांची झटापट सुरू होती. हे पाहून शर्मा तेथे गेल. एका चोराशी झटापट करून त्यांनी त्याला पकडून दिले.

सीबीडीतील बारवर छापे
नवी मुंबई : सीबीडी येथील ‘नाइट अँगल बार’वर शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या छाप्यात २२ बारबालांसह १९ ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बारमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खात्री केल्यानंतर गुन्हे शाखेने बारवर छापे टाकले. शहरातील बार व पबमधील गैरप्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. त्यानंतर शहरातील बार व पबविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे.