मुंबई : मोबाइल अ‍ॅपवर मुस्लिम महिलांची छायाचित्रे प्रसारित करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून विशाल कुमार झा या तरुणाला अटक केली. पोलिसांनी उत्तराखंड येथून १८ वर्षांच्या तरुणीला ताब्यात घेतले असून, ती प्रमुख आरोपी असल्याचे बोलले जाते.  विशाल हा मूळचा बिहारचा रहिवासी असून, तो स्थापत्य अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणीशी विशालची समाजमाध्यमांवरून ओळख झाली होती. दोघेही या प्रकरणाच्या कटातही सहभागी आहेत. तरुणीला मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. न्यायालयाने विशालला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आह़े