दोघा भावांना अटक; ५०हून अधिक दुचाकी चोरल्याचा संशय

बॉलीवूडला चित्रपटाच्या गरजेनुसार हवे ते बदल करून (मॉडीफाय) दुचाकी पुरवणारे दोन भाऊ प्रत्यक्षात चोर असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे आली. या दोघांनी आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने गेल्या काही महिन्यांमध्ये शहराच्या विविध भागांमधून असंख्य दुचाकी चोरल्या. त्यापैकी ५० गुन्हे शाखेने हस्तगत केल्या. विशेष म्हणजे मुलुंडच्या आर मॉल येथे पोलिसांनी सर्वसामान्यांना सतर्क करण्यासाठी लावलेल्या ‘दुचाकी चोरांपासून सावधान’ अशा फलकाजवळून या टोळीने सलग ८ अ‍ॅक्टिव्हा चोरल्याची माहिती तपासातून स्पष्ट झाले.

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi
एका दगडात दोन पक्षी, मोदी आणि भाजपा दोघांनी ४०० पार जागांचा अर्थच बदलला
Special court order BJP MP Pragya Singh
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला नियमितपणे उपस्थित राहा, साध्वी प्रज्ञासिंह यांना विशेष न्यायालयाचे आदेश
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

आरिफ चांदशेख, त्याचा भाऊ आसिफ, मिलिंद सावंत आणि साहिल गांजा अशा चार तरुणांना गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाने गेल्या आठवडय़ात बेडय़ा ठोकल्या. कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक महेश देसाई यांना चोरीच्या एका दुचाकीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार कक्षाचे उपनिरीक्षक वाल्मीक कोरे, अंमलदार पेडणेकर, नाईक, गावकर, वारंगे आणि पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून या चौघांना अटक केली. चौकशीत या चौघांनी मुलुंड, विक्रोळी, पवई, अंधेरी, गोरेगाव, सांताक्रूझ, वांद्रे, ओशिवरा, ठाणे या भागातून ५० दुचाकी चोरल्याची माहिती दिली. पथकाने या सर्व दुचाकी जप्त केल्या. या दुचाकी कुठून चोरल्या त्या त्या ठिकाणी आरोपींना नेण्यात आले. मजल-दरमजल करता पथक मुलुंड पश्चिमेकडील आर मॉलजवळ आले. दुचाकी चोरलेले ठिकाण आरोपींनी पथकाला दाखवले तेव्हा अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या ठिकाणी मुलुंड पोलिसांनी ‘सावधान..वाहने पार्क करण्यासाठी आर मॉलच्या अधिकृत वाहनतळाचा वापर करा, या परिसरात अ‍ॅक्टीव्हा चोरीचे प्रमाण वाढले असून वाहन पार्क करताना सावधानता बाळगावी, चालकाचे लक्ष विचलित करून चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याबाबत सतर्क असावे’ अशा सूचना सर्वसामान्यांना देणारा फलक लावलेला आढळला. मॉलच्या वाहनतळाचे भाडे चुकवण्याच्या नादात अनेक जण मॉलसमोरील रस्त्यावर दुचाकी पार्क करतात. तेथूनच या टोळीने वाहने चोरली. या फलकासमोरून आठ अ‍ॅक्टिव्हा आम्ही चोरल्या, अशी माहिती आरोपींनी पथकाला दिली.

आसिफ या टोळीचा प्रमुख असून तो व त्याचा भाऊ आरिफ यांचा दुचाकींचे रूपडे पालटण्यात हातखंडा आहे. अटक करण्यात आलेले चौघेही मेकॅनिक असल्याची माहितीही समोर आली आहे. रणवीर सिंग, अर्जून कपूर यांनी अभिनय केलेल्या ‘गुंडे’ या चित्रपटात वापरण्यात आलेली दुचाकी या दोघांनी तयार केली होती, अशी माहिती पुढे आली आहे.

‘हॅण्डल लॉक’ धोकादायक

सर्वसामान्यपणे हॅण्डल लॉक असलेल्या दुचाकी चोरण्याच्या भानगडीत चोर पडत नाहीत. पण सध्या रस्त्यावर जास्त प्रमाणात दिसणाऱ्या एका दुचाकीचे हॅण्डल लॉक इतके तकलादू आहे की हाताने जोर लावूनही ते तोडता येते. तेही अवघ्या दोन ते तीन सेकंदात. याचे प्रात्यक्षिक पथकातील अनुभवी अधिकाऱ्यांनी पाहिलेले आहे. ‘हॅण्डल लॉक’चा अडथळा दूर झाल्यावर ‘एलएन’ की म्हणजेच इंग्रजी एल आकाराची कच्ची चावी, उत्पादक कंपन्यांकडून चावी तयार करण्यासाठी ज्याचा वापर होतो ती वापरून ही टोळी एका झटक्यात दुचाकी सुरू करत होती, अशी माहितीही पथकाला मिळाली आहे.

टोळीची कार्यपद्धती

गॅरेजमध्ये डागडुजीसाठी आलेल्या ग्राहकांना आणखी १५ ते २० हजार रुपये दिल्यास दुचाकी अगदी कोरी करकरीत करून देऊ, असे आवाहन टोळी करत असे. ग्राहकाने पैसे दिल्यास त्याच्या दुचाकीप्रमाणेच म्हणजेच मॉडेल, रंग, वर्ष लक्षात घेऊन टोळी तशीच दुचाकी चोरत असे. चोरलेल्या दुचाकीवरील इंजिन, चेसी नंबर खोडून त्यावर ग्राहकाच्या दुचाकीचे नंबर टाकले जात. नंबर प्लेट बदलून ही दुचाकी ग्राहकाच्या ताब्यात दिली जाई. ग्राहकाच्या मालकीची दुचाकी भंगारात विकून आणखी पैसे मिळवले जात. आतापर्यंत एकाही ग्राहकाला ही आपली दुचाकी नाही, असा संशय आलेला नाही हे विशेष!