मुंबईः पोलीस असल्याची बतावणी करून प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देसाईकडे खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींनी अमलीपदार्थाचे सेवन केल्याचा आरोप करून कृतिकाला धमकावले होते. कृतिका चित्रीकरण आटोपून घरी जात असताना गोरेगाव येथील फिल्मसिटी ते गोकुळधाम या परिसरात दुचाकीवर आलेल्या तीन व्यक्तींनी तिची गाडी अडवली. गाडीत अमलीपदार्थ असल्याचे खोटे सांगून गाडीची तपासणी करायची असल्याचे सांगितले.

कृतिकाला प्रथमदर्शनी त्यांच्यावर संशय आला आणि तिने त्यांना ओळखपत्र विचारले. जवळचे पिवळ्या रंगाचे काही कागद दाखवून त्यांनी कृतिकाच्या हाताचा वास घेण्याचा प्रयत्न केला. कृतिका तात्काळ सतर्क झाली. तिने तेथे महिला पोलिसांना बोलवा आणि मगच माझी तपासणी करा असे तिने सांगितले. तसेच प्रसंगावधान राखून मोबाईलमध्ये या सर्व घटनेचे चित्रीकरण केले. त्यानंतर तिघांनी तिथून पळ काढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पवन विश्वकर्मा(२८) व शंकर पंदीधर(२७) यांना अटक केली. विश्वकर्मा हा गोरेगाव, तर पंदीधर हा मालाड येथील रहिवासी आहे. याप्रकरणी आरोपींचा साथीदार अतुल भोसले(३५) याचाही सहभाग आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.