मुंबई : शिवडी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना काळाचौकी पोलिसांनी अटक केली. आरोपीने बनावट स्वाक्षरी करून धनादेशाद्वारे चौधरी यांच्या बँक खात्यातून ७८ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता. या धनादेशाची सत्यता पडताळण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता फसवणूक उघडकीस आली. याप्रकरणी आरोपींच्या आणखी एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

 सुकेतू रमेशचंद्र दवे (४७) आणि जयेश चंद्रकांत शहा (५४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील दवे हा गुजरातमधील अहमदाबाद, तर शहा हा कांदिवली येथील रहिवासी आहे. परळ येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार चौधरी यांना आमदार म्हणून मिळणारे मासिक मानधन युनियन बँक ऑफ इंडियाच्या लालबाग शाखेत जमा होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील नारनपुरा शाखेतील बँक अधिकाऱ्यांना चौधरी यांची स्वाक्षरी असलेला धनादेश मिळाला होता. त्याबाबत संशय आल्यानंतर तेथील बँक कर्मचाऱ्यांनी लालबाग शाखेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. त्यानंतर लालबाग शाखेच्या व्यवस्थापकाने चौधरी यांच्या स्वीय सहाय्यकाशी संपर्क साधला आणि बँकेच्या अहमदाबाद शाखेला चौधरी यांनी दिलेला ७८ लाख रुपयांचा धनादेश मिळाला आहे, असे सांगितले. चौधरी बैठकीमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी मुलगा सिद्धेश याला बँक व्यवस्थापकाशी समन्वय साधण्यास सांगितले. वडिलांच्या सूचनेनुसार सिद्धेशने बँक व्यवस्थापकाला असा कोणताही धनादेश त्यांच्या वडिलांनी दिला नसल्याचे कळवले. त्यानंतर बँकेने या धनादेशाबाबतची पुढील प्रक्रिया थांबवली. त्यानंतर धनादेश व जमा करण्यात आलेली पावती यांचे छायाचित्र चौधरी यांना ईमेल केले.

कागदपत्रे पाहिल्यानंतर या धनादेशावरील  स्वाक्षरी बनावट असल्याचे चौधरी यांनी बँकेला सांगितले. तसेच बँकेच्या धनादेशावरील अनुक्रमांक असलेली धनादेशाची पुस्तिकाही बँकेने कधीही छापली नसल्याचे सांगितले. त्यानंतर चौधरी यांनी याप्रकरणी गुरूवारी काळाचौकी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी अहमदाबाद येथील बँक खात्यात पैसे हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न केला. ते खाते दवेचे असल्यामुळे पोलिसांनी त्याला अहमदाबाद येथून अटक केली. त्यानंतर चौकशीत दवेने जयेशने त्याला एका टूर कंपनी मार्फत धनादेश पाठवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुंबईतून जयेशला अटक केली. याप्रकरणी आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.