मुंबईः आरे कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून मेट्रो कारशेडच्या  बांधकामाविरोधात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिसरातील बंदोबस्तात वाढ केली आहे. याशिवाय आंदोलनकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत नोटीस बजावण्यासही सुरूवात करण्यात आली आहे. आरे कॉलनी परिसरात मेट्रोशेडच्या बांधकामासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर  शासनाने घेतलेला हा निर्णय रद्द करावा, यासाठी आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत.

या निर्णयाच्या निषेधार्थ आतापर्यंत आम आदमी पार्टी, शिवसेना आणि काँग्रेस आंदोलनात उतरले आहेत. त्यामुळे स्थानिक परिमंडळातील पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाचे जवानही परिसरात तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय गरज पडल्यास अतिरिक्त कंपन्यांनाही सतर्क राहण्यास सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत अनेकांना सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात तबरेज सय्यद व जयेश भिसे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. येणाऱ्या काळात आणखी नोटीस बजवण्यात येणार आहे.