मुंबई : गोरेगाव आरे वसाहतीतील अथर्व शिंदेच्या हत्येचा छडा लावण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. या प्रकरणात वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी असणाऱ्या बारा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये केलेल्या तपासात अथर्व बंगल्यातून बाहेर पडून रिक्षा पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. या बंगल्यातील केअरटेकर आणि अन्य कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
अथर्वचा रविवारी संध्याकाळी आरे वसाहतीतील रॉयल पाम्सच्या मागील बाजूस मृतदेह आढळला होता. एका मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी अथर्व येथील २१२ क्रमांकाच्या बंगल्यात आला होता. त्यावेळी या भाडय़ाने घेतलेल्या बंगल्यात काही तरुण-तरुणी उपस्थित होते. या पार्टीत सहभागी झालेल्या एका तरुणाने सांगितले की, मी जाण्याआधीच पार्टी सुरू झाली होती. तेथे जवळपास १२ जण उपस्थित होते. तसेच अथर्वची मैत्रिणही सोबत होती. गेटजवळच अन्य दोन जणांमध्ये काही कारणास्तव वाद सुरू होता आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. हे पाहताच अथर्व आणि त्याच्या मैत्रिणीने तेथून तात्काळ बाहेर पडले. अथर्व रिक्षा पकडण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र रिक्षा मिळत नसल्याने सोबत असलेली अथर्वची मैत्रिण ही पुन्हा बंगल्याच्या गेटजवळ आली. मी घरी जात असताना त्याला रिक्षा पकडताना पाहिले. यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले होते, असेही हा तरुण म्हणाला.
पार्टीच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले आहे. अथर्वच्या मृतदेहावर जखमाही आढळल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.