शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या विरोधात राज्यात जाळपोळ आणि हिंसक प्रकार घडू लागल्याने बुधवारी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दिवशी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राजभवनकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. त्यातच सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिल्याने पोलिसांची कसोटी लागणार आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात कोणतीही गडबड होऊ नये म्हणून राजभवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विविध संघटनांकडून होणाऱ्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. राज्यात काही ठिकाणी हिंसक प्रकार घडल्याने राजभवन, मंत्रालय परिसरात निदर्शने किंवा आंदोलन होऊ नये या उद्देशाने कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राजभवनकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच राजभवन परिसरात ये-जा करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनांना या परिसरात बंदी घालण्यात येणार आहे.
भाजप सरकारच्या धोरणांच्या विरोधात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मंत्रालय परिसरात घुसण्याची शक्यता लक्षात घेता या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
राज्यभरात तीव्र पडसाद
पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देऊ नये, या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी आज निदर्शने करण्यात आली. दरम्यान. या  पाश्र्वभूमीवर  बाबासाहेब पुरंदरे यांच्या पर्वती पायथ्यालगत असलेल्या  निवासस्थानी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
पंढरपूर येथे सायंकाळी एका एसटी बसवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करत ती जाळून टाकली. या वेळी त्यांनी पुरंदरे आणि राज ठाकरे यांच्या निषेधाची पत्रके टाकली. दरम्यान पुण्यातही अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, विश्वकर्मा प्रतिष्ठान, राष्ट्रप्रेमी समितीनेही या पुरस्काराला विरोध केला आहे. िपपरी-चिंचवड शहरातही विविध संस्था, संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले. बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. परळी, धारूर, गेवराई येथे संघटनांनी या मागणीसाठी आंदोलन केले. परभणीमध्ये संभाजी ब्रिगेडने दोन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले, तर काही ग्रामपंचायतींनी पुरस्काराला विरोध असणारे ठराव संमत केले.