अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी एजाज लकडावाला याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावरुन त्याला अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. एजाज लकडावाला मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत होता. २००३ मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला अशी अफवा पसरली होती.

मात्र या हल्ल्यात एजाज लकडावाला वाचला होता. यानंतर तो बँकॉकहून कॅनडाला गेला होता आणि तिथेच गेल्या अनेक काळापासून वास्तव्य करत होता. एजाज लकडावाला याच्याविरोधात मुंबई आणि राजधानी दिल्लीत अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, खंडणी सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छोटा राजनला साथ दिल्याने दाऊद इब्राहिम लकडावाला याच्यावर नाराज झाला होता. याआधी एजाज लकडावालाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर तिला अटक करण्यात आली होती. बनावट पासपोर्टच्या सहाय्याने देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात ती होती . तिची चौकशी केली असता एजाज लकडावालासंबंधी माहिती उघड झाली होती. त्याद्वारे एजाज लकडावाला याचा माग काढून पोलिसांनी त्याला पाटणा येथून अटक केली.