मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांची संख्या गेल्या काही महिन्यांत कमी झाली असली तरी हा महामार्ग पूर्णपणे अपघातमुक्त करण्याची योजना आकार घेत आहे. या महामार्गावरील अपघातांबाबत खास अहवाल तयार करण्यात आला असून तो अंतिम टप्प्यात आहे. या अहवालात करण्यात आलेल्या सूचनांची राज्य रस्ते महामंडळाने तंतोतंत अमलबजावणी केली तर हा महामार्ग अपघातमुक्त होईल, असा दावा राज्य महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक सुरेंद्र पाण्डेय यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
महामार्ग पोलीस सध्या कमी संख्याबळामुळे पूर्णपणे कार्यक्षमतेने काम करू शकत नाहीत, अशी कबुली त्यांनी दिली. गेल्या आठवडय़ात आपण उस्मानाबाद येथील महामार्गाची अचानक पाहणी केली. त्यावेळी कमी संख्याबळाची अडचण तातडीने जाणवली. सुधारणा खूप करण्यासारख्या आहेत. परंतु त्यासाठी मनुष्यबळ हवे. उपलब्ध मनुष्यबळात अधिकाधिक कार्यक्षमता कशी दाखविता येईल, या दिशेने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
या क्षेत्रात काम करणाऱ्या एका संस्थेला मुंबई-पुणे महामार्गावरील बारकाव्यांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. या अहवालातील शिफारशींची तातडीने अमलबजावणी करण्यासाठी आपण स्वत: रस्ते महामंडळाला पत्र लिहून त्याचा पाठपुरावा करणार आहोत. या सूचना आणि आमची कारवाई यांचा मेळ जमल्यास मुंबई-पुणे महामार्ग अपघातमुक्त होईल, असा दावाही त्यांनी केला.
जड वाहनांविरुद्ध कारवाई सुरू
अतिमहत्त्वाचा महामार्ग म्हणून मुंबई-पुणे महामार्गाकडे पाहिले जाते. हा महामार्ग अपघातमुक्त करण्यावर आपला भर आहे. त्याचाच भाग म्हणून जड वाहनांसाठी सक्तीने डावी मार्गिका ठेवण्यात आली आहे. त्याची अमलबजावणी न करणाऱ्या वाहनांवर बुधवारपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई करण्याआधी जड वाहनांच्या चालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यापुढे मात्र या वाहनचालकांची अजिबात गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महामार्गावरून बांधकामासाठी सळ्या घेऊन जाणाऱ्या वाहनांवरही लवकरच कारवाई सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune road to be accident free
First published on: 10-04-2014 at 07:39 IST