पाऊस, उधाणलेला समुद्र, सोसाटय़ाच्या वाऱ्यांमुळे मुंबईची दाणादाण;

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठिकठिकाणच्या पूरसदृश स्थितीमुळे ‘२६ जुलै’ची आठवण

मुंबई: हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार मुसळधार पावसासाठी सज्ज राहून नित्यक्रमाला लागलेल्या मुंबईकरांना बुधवारी पावसाचा रुद्रावतार पाहून धडकीच भरली. मुसळधार सरी, सोसाटय़ाचा वारा आणि त्यामुळे समुद्राला आलेले उधाण असे तिहेरी संकट एकाच वेळी आल्याने अवघे शहर जलमय झाले. टाळेबंदीतून मुक्त झाल्याच्या दिवशीच पावसाने मुंबईकरांना जखडून ठेवले. नदी, नाल्यांना आलेला पूर पाहून मुंबईकरांच्या मनातील ‘२६ जुलै’च्या भीतीदायक आठवणी ताज्या झाल्या.

जून आणि जुलैमध्ये लपंडाव खेळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासून मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. मात्र, बुधवारी त्याचा नूरच वेगळा होता. पहाटेपासूनच वादळीवारे घोंघावू लागले आणि त्यासोबत आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई काही वेळेतच जलमय झाली. कधी नव्हे ते दक्षिण मुंबईमधील नरिमन पॉइंट, चर्चगेट, मरिन ड्राइव्ह, गिरगाव आदी ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. मरिन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यावर रौद्ररूपी लाटा धडकू लागल्या. कधी नव्हे ते गिरगाव चौपाटीलगतच्या सुभाषचंद्र बोस मार्गावर प्रचंड पाणी साचले. ग्रॅन्ट रोड, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई सेंट्रल, सातरस्ता, लालबाग, परळ, हिंदमाता, दादर, माहीम, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, भांडूप, चुनाभाट्टी, मानखुर्द यांसह विविध परिसर जलमय झाले. उपनगरांतील नदी आणि नाले दुथडी भरून वाहू लागले. नाल्याच्या काठावर उभ्या असलेल्या झोपडय़ांमधील रहिवाशांचा पावसाचा रुद्रावतार पाहून थरकाप उडाला. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आणि मोठे नुकसान झाले. जलमय झालेल्या रस्त्यांवरील उभ्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. चर्चगेट, नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह यांसह ठिकठिकाणचे मोठे वृक्ष उन्मळून पडले. मंगळवारी रात्रीपासून कोसळणारा संततधार पाऊस आणि बुधवारी दुपारी १.१९ वाजता समुद्राला आलेली भरती यामुळे पाण्याचा झटपट निचरा होऊ शकला नाही. दुपारनंतरही मुंबईत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतच होता. परिणामी, अवघी मुंबापुरी जलमय झाली.

अनेक भागात साचलेले पाणी आणि वृक्ष उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली. तर रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी रेल्वे गाडय़ांमध्ये अडकून पडले. रेल्वे सेवाही कोलमडली. शहर आणि

पूर्व उपनगरांच्या तुलनेत पश्चिम उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कमी होता. मात्र सायंकाळी पश्चिम उपनगरांमध्येही पावसाने जोर धरला.

मुंबई शहरातील ११२, पश्चिम उपनगरात १३, तर पूर्व उपनगरातील १६ अशा एकूण १४१ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. मुंबई विद्यापीठासमोरी मोठमोठय़ा वृक्षांची पडझड झाली. झाडांच्या मोठय़ा फांद्या बेस्टच्या गाडय़ावर पडले. त्यामुळे बसगाडय़ांचे मोठे नुकसान झाले. तर अन्य ठिकाणी झाडांच्या पडझडीमुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले.

निवाऱ्याची व्यवस्था

कामावर आलेले अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी ठिकठिकाणी अडकून पडले. मुंबई महापालिकेने या सर्वासाठी रेल्वे स्थानक आणि आसपासच्या पालिका शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था केल्याचे पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून कळवण्यात आले.

सज्जा कोसळून दोघे जखमी

भांडूप (प.) येथील भांडूप गाव रोड येथील अंजना इस्टेट चाळ या एकमजली इमारतीच्या सज्जाचा भाग कोसळला. या दुर्घटनेत घरातील दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या. अजय अगरवाल (४८), कांती अगरवाल (६६) अशी त्यांची नावे असून टी. एम. अगरवाल रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

१७०.६ मि.मी. मुंबई शहर

५९.३४ मि.मी.  पूर्व उपनगर

५६.०३  मि.मी. पश्चिम उपनगर

रुग्णालयेही पाण्यात

मुंबई: शहरात सकाळपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे केईएम, नायर आणि जेजे रुग्णालयात पाणी साचले. करोनामुळे येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असली तरी कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

परळ, माटुंगा, हिंदमाता परिसरात बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे. सखल भागामध्ये रुग्णालये असल्याने मुंबई सेट्रल येथील नायर, परळमधील केईएम रुग्णालयात बुधवारी पाणी साचले. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची परवड झाली. तसेच रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पाण्यातून जावे लागत होते. रुग्णालय आवारातील झाडे पडल्याने काही गाडय़ांचेही नुकसान झाले आहे. नुकत्याच सुरू झालेल्या बारुग्ण विभागामध्ये आलेले रुग्ण जोरदार पावसामुळे अडकून पडले होते. जेजे रुग्णालयातही तळमजल्यावर पाणी साचले होते. तसेच शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात पाणी साचल्याने डॉक्टरांची तारांबळ उडाली. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट क्लब येथे उभारलेल्या करोना आरोग्य केंद्राच्या बाहेरील बाजूस उभारलेले लाकडी शेड जोरदार वाऱ्यामुळे कोसळले. वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना आरोग्य केंद्रामध्ये मात्र कोणतीही हानी झालेली नाही. संध्याकाळपर्यत पावसाचा जोर कायम राहिल्याने येथील कर्मचाऱ्यांची कोंडी झाली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rains updates heaviest rainfall since 2005 in mumbai zws
First published on: 06-08-2020 at 01:59 IST