मुंबई : उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाडयामुळे होणारी काहिली बुधवारीही कायम राहणार आहे. मुंबईत गेल्या दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ केंद्राने सरासरी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली तर ठाण्यात सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

मुंबईत गेल्या दहा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक उष्ण दिवसाची नोंद मंगळवारी झाली. मुंबईत मंगळवारी कमाल तापमान चार अंशानी अधिक नोंदले गेले. यापूर्वी २२ एप्रिल रोजी ३९ अंश कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती. तो विक्रम मंगळवारी मोडीत निघाला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ३ अंशानी अधिक होते. सांताक्रूझ केंद्रातील तापमानही सरासरीपेक्षा ६ अंशानी अधिक होते.

हेही वाचा >>> विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश

राज्यात मंगळवारी सर्वाधिक तापमान (४२.४) जळगाव येथे नोंदवले गेले. त्याखालोखाल ठाणे-बेलापूर केंद्रात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईसह, ठाणे, रायगड येथे उष्णतेची लाट कायम असेल मात्र त्याची तीव्रता कमी असेल. तसेच कोकणातील काही भागात उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यानंतर पुढील दोन तीन दिवसानंतर तापमानात आणखी २ ते ३ अंशानी घट जाणवू शकेल असेही स्पष्ट केले आहे.  दरम्यान, बुधवारीही उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शाळांना सुट्टी जाहीर करा – राज ठाकरे

राज्यातील तापमानाचा वाढता पारा लक्षात घेता त्याचा थेट फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करुन शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. राज ठाकरे यांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून पोस्टमध्ये शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली.

उष्माघाताचे पाच नवे रुग्ण

मुंबई : राज्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर पोहोचली आहे. तीन दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये धुळयामधील तीन तर ठाणे व सोलापूरमधील प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. १ मार्च ते १२ एप्रिल या ४२ दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे ७७ रुग्ण आढळून आले होते.