‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दरवर्षी मुंबईत नेमाने कोसळणाऱ्या पावसाळ्यात मुंबईकरांची दैना उडते, यात काही वादच नाही. एका हातात छत्री, दुसऱ्या हातात बॅगा सांभाळत गर्दीतून वाट काढण्याची कसरत करणाऱ्या मुंबईकरांना सध्या पायांनाही डोळे असायला हवे होते, असे वाटायला लागले आहे. याला कारण मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले महाकाय खड्डे! दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील सर्वच महत्त्वाचे रस्ते खड्डय़ांनी व्यापले आहेत. यंदा पाऊस थोडासा उशिरा आला असला तरी पावसाची सुरुवात झाल्यावर खड्डे मात्र वेगाने वाढले आहेत. कांजूरमार्ग, दादर, मानखुर्द येथे रस्त्यांवर पडलेल्या या भल्यामोठय़ा खड्डय़ांमुळे मुंबईतील वाहतुकीचा नूर बदलून गेला आहे. त्यातच या खड्डय़ांमध्ये पाणी साचल्यावर त्यातून चालताना पादचाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडत आहे.