मुंबई : सौराष्ट्राहून आलेले धूलिकणयुक्त वारे आणि त्याचवेळी तापमानात घट होऊन वाऱ्यांचा वेग मंदावल्याने सोमवारी मुंबई आणि परिसरात हवेचा दर्जा ‘धोकादायक’ श्रेणीत नोंदला गेला़  कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याने हुडहुडीही कायम राहिली़  

सोमवारी कुलाबा येथे २४.६ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे २४.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. कुलाबा येथे १६.२ अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे १५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दिवसभर हवेत गारवा होता, तर रात्री कडाक्याची थंडी होती़

 मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी ३८७ म्हणजेच ‘तीव्र प्रदूषण’ धोकादायक श्रेणीत होता़  माझगाव येथे ५७३, कुलाबा येथे ५१३ असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. या दोन्ही ठिकाणच्या हवेने ‘तीव्र प्रदूषण’ श्रेणीचीही मर्यादा ओलांडली होती.

मालाड येथे ४५३, बोरिवली येथे ४५१, चेंबूर येथे ४१६, अंधेरी येथे ४२६ असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. त्यामुळे येथील हवा ‘तीव्र प्रदूषण’ श्रेणीत होती. भांडुप येथे ३८२, वरळी येथे ३४९, वांद्रे कुर्ला संकुल येथे ३२८ असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. त्यामुळे येथील हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत होती. धूलिकणांच्या वादळाचा परिणाम कमी होत जाऊन पुढील दोन दिवसांत मुंबईतील प्रदूषणात काही प्रमाणात घट होणार आहे. तसेच २७ जानेवारीपासून हवेची गुणवत्ता सुधारण्यास सुरूवात होईल. मात्र, पुढील दोन्ही दिवस काळजी घेणे आवश्यक आहे.

काय काळजी घ्यावी ?

तीव्र प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दम्याचा त्रास असलेल्या नागरिकांनी त्यांची औषधे जवळ बाळगावीत. घराच्या खिडक्या, दारे बंद ठेवावीत.

आणखी तीन दिवस गारठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी नाशिक आणि महाबळेश्वरचा पारा मोठय़ा प्रमाणावर घसरला. या भागांत अनुक्रमे ६.६ आणि ६.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले. मुंबईसह राज्यभर आणखी तीन दिवस गारठा राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आह़े