सामूहिक बलात्काराची घटना घडूनही मुंबई महिलांसाठी सुरक्षित असल्याचा दावा मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी शुक्रवारी केला.
एका आरोपीला अटक केल्यानंतर सिंग पत्रकारांशी बोलत होते. मुंबईत बलात्काराच्या घटना वाढत आहेत. मात्र ९० टक्के बलात्कार प्रकरणात आरोपी हे मुलीचे परिचित तसेच नातेवाईक असतात, असे आयुक्त सत्यपाल सिंग सांगत होते. परंतु देशाला हादरविणारी छायाचित्रकार तरुणीवरील सामूहिक बलात्काराची घटना घडूनही मुंबई महिलांसाठी सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
बंद पडलेल्या शक्ती मिलच्या निर्जन जागेत ही घटना घडली होती. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी बंद पडलेल्या गिरण्या, मोकळ्या जागा, इमारती या ठिकाणी प्रवेष निषिद्ध अशा आशयाचे फलक लावण्याच्या सूचना जागा मालकांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपींना कडक आणि लवकर शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची शिफारस करणार असल्याचे ते म्हणाले.
आरोपींना कसलीही पळवाट मिळू नये यासाठी सर्व प्रकारचे वैज्ञानिक पुरावेही गोळा केले जात असल्याचे त्यांनी
सांगितले.