महाराष्ट्र राज्य सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत पहिल्यांदाच ‘मुंबई शॉपिंग फेस्टीव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रकारचा भारतातील हे पहिलेच फेस्टीव्हल असून ते १२ ते ३१ जानेवारीदरम्यान मुंबईच्या तीन भागात आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हा फेस्टीव्हल आयोजित करत असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत राज्यातील, देशातील आणि परदेशातील नागरिकांनी यावे यासाठी याचे आयोजन करण्यात आले असून आता दरवर्षी डिसेंबरमध्ये हा फेस्टीव्हल होणार असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या फेस्टीव्हलचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी जिओ गार्डन्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा ‘नाईट बाजार’ शनिवार आणि रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना आपल्या सोयीनुसार रात्रीच्या वेळीही घराबाहेर पडून मुंबई शॉपिंग फेस्टीव्हलचा आनंद घेता येणार आहे. नागरी वसाहत नसणाऱ्या ठिकाणी हा फेस्टीव्हल असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. मालाडच्या माईंडस्पेस या ठिकाणी १९ आणि २० जानेवारी रोजी तर पवईमध्ये हायको याठिकाणी २६ आणि २७ जानेवारी रोजी या फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवायही इतर १३ ठिकाणी फेस्टीव्हलशी निगडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये नागरिकांना खरेदीबरोबरच मुंबईतील विविध पदार्थांचा तसेच राज्यातील कलांचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये रिअल इस्टेट, सोने यांपासून अगदी दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे स्टॉल असतील असेही रावल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहनही रावल यांनी केले. फेस्टीव्हलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर बक्षिसांचा वर्षाव होणार असून खरेदीदारांना फेस्टीव्हल दरम्यान दररोज, साप्ताहिक तसेच बंपर बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai shopping fest night shopping festival maharashtra government initiative
First published on: 09-01-2018 at 20:12 IST