मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचे ‘सूर’ घुमणार आहेत. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना महादेवन आणि त्यांच्या अकादमीतर्फे संगीताचे धडे दिले जाणार आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली असून, संगीताचे वर्ग येत्या जूनपासून नियमितपणे सुरू होणार आहेत. शंकर महादेवन आणि त्यांच्या अकादमीतर्फे विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देण्यात येतील. शंकर महादेवन यांनी संगीत शिक्षणासाठी ‘शंकर महादेवन अकादमी’ची स्थापना केली आहे. मुंबईतील महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनाही संगीत शिकवण्याचा महादेवन यांचा मनोदय होता. आदित्य ठाकरे यांनीही महादेवन यांना विनंती केली होती. तसेच याबाबत पाठपुरावाही केला होता. त्यांची विनंती स्वीकारून महादेवन यांनीही शाळेतील मुलांना संगीताचे शिक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. याबद्दल आदित्य ठाकरे यांनी शंकर महादेवन यांचे आभार मानले आहेत. मुलांना संगीत शिक्षण घेता यावे यासाठी महापालिका शाळांमध्येही स्वतंत्र संगीत विभाग सुरू करण्यात आले आहेत.

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शंकर महादेवन अकादमीच्या माध्यमातून संगीताचे शिक्षण घेता येणार आहे. हा चांगला अनुभव असेल. महापालिका प्रशासनाचे आणि आदित्य ठाकरे यांचे आभार, असे ट्विट शंकर महादेवन यांनी केले आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनीही शंकर महादेवन यांचे आभार मानले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर काही शाळांमध्ये सुरुवातीला संगीताचे धडे दिले जाणार आहेत. येत्या जूनपासून नियमितपणे सर्व पालिका शाळांमध्ये शंकर महादेवन मुलांना संगीत शिकवणार आहेत, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.