सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींसोबत झालेली मैत्री महागात पडल्याच्या अनेक घटना समोर आल्यात. आता पुन्हा एकदा मुंबईत अशीच एक घटना घडली आहे. इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झालेली मैत्री किती धोकादायक ठरु शकते हे मुंबईच्या कुलाबा परिसरात पुन्हा एकदा बघायला मिळालं आणि मुलीने केलेल्या एका चुकीचा फटका तिच्या सर्व कुटुंबाला बसला.

मुंबईच्या कुलाबा परिसरात गेल्या आठवड्यात ही घटना घडली. कुलाब्यात एक चार्टर्ड अकाउंटचं(CA) कुटुंब राहतं. ‘सीए’च्या मुलीची एका १९ वर्षीय शैजान अगवान नावाच्या तरुणासोबत इंस्टाग्रामवर मैत्री झाली.  काही दिवसांमध्येच मुलीने या अनोळखी तरुणावर इतका विश्वास ठेवला की तिने आपल्या घराची एक डुप्लिकेट चावी त्याला दिली. तो माझगावमध्ये राहतो. अशातच काही दिवसांनी मुलीचे कुटुंबिय फिरण्यासाठी बाहेरगावी गेले होते आणि २७ जानेवारी रोजी ते परतले. पण घरी परतल्यावर त्यांना धक्काच बसला. कारण, घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि एक आयफोन गायब होता. जवळपास १४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी गेले होते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कुटुंबियांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घरात चोरी झाल्याची माहिती दिली.

घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस त्यांच्या घरी पोहोचले. सुरूवातीच्या तपासात घरात कोणी बळजबरी शिरलेलं नसून घरातल्याच किंवा घराबाबत माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच चोरी केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी शेजारी, सुरक्षा रक्षक आणि अन्य लोकांकडे चौकशी केली पण कोणताही पुरावा मिळाला नाही. अखेर पोलिसांनी तक्रारकर्त्यांना स्वतःच्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा करण्यास सांगितलं. सुरूवातीला घटनेबाबत काहीही माहित नाही असं सांगणाऱ्या मुलीने अखेर शैजान नावाच्या एका मित्राला घराची डुप्लिकेट चावी दिली होती अशी कबुली दिली. त्यानंतर त्याच्यासोबत कशी भेट झाली आणि मैत्री कशी झाली याबाबत तिने सांगितलं. पोलिसांना शैजानबाबत समजताच तातडीने पावलं उचलत त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक लाख रुपये आणि आयफोन हस्तगत केला आहे.