शहराच्या तापमानात अचानक वाढ; घामाच्या धारांनी नागरिक हैराण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुसळधार पावसानंतर मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना दररोज विचित्र वातावरणाचा सामना करावा लागत आहे. पहाटे धुके, दुपारी भीषण उन आणि संध्याकाळी गडगडाटी ढगांची अनुभूती घेत सर्दी आणि तापाशी लढाई करताना मंगळवारी अचानकच पारा वधारला आणि घामाच्या धारांनी मुंबई, ठाण्यातील नागरिकांना हैराण केले. ठाणे- नवी मुंबईत मळभयुक्त वातावरण दाटून दुपारपासूनच नोकरदार घामाची अंघोळ करूनच घरी परतत होते. रेल्वे-बसमध्ये तापमान वाढल्याची चर्चा होती आणि सरबत-कोल्ड्रींग्ज आणि आईस्क्रीमला मागणी वाढली होती. मंगळवारी सांताक्रूझ येथे कमाल ३५.९ अंश से. तापमानाची वाढ झाली. हे गेल्या दहा वर्षांतील सांताक्रूझ येथील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान आहे. बुधवारी मात्र तापमान कमी होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

सोमवारी सांताक्रूझ येथे ३५.५ अंश से. तापमान होते. मंगळवारी या तापमानात आणखी वाढ झाली. ३० सप्टेंबर २०१४  रोजी ३७ अंश से. या विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. ३० सप्टेंबर २०१५ रोजीही ३६.२ अंश से. कमाल तापमान नोंदले गेले होते. मात्र या दोन्ही वेळा सप्टेंबरच्या अखेरच्या तारखांना  सर्वाधिक तापमान होते. यावेळी मात्र दुसऱ्या आठवडय़ातच तापमान वाढले असल्याने सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटचा अनुभव येत आहे.

ता प भा न : गेल्या दहा वर्षांतील तिसऱ्या क्रमांकाच्या तापमान उच्चांकाशी मंगळवारी बरोबरी झाल्यामुळे संपूर्ण मुंबई शहरामध्ये काहिलीचा सामना करावा लागला. दररोजच तापमानामध्ये तफावत घडत असून कधी कधी दिवसांत तीन वेळा तापमानामध्ये मोठा बदल घडत आहे. रविवारी तापमान ३३.४ अंश होते. सोमवारी देखील दुपारी कडक उन होते. मंगळवारी या आठवडय़ातील सर्वाधिक उकाडा जाणवला आणि तापमानाने मे महिन्यासारखा त्रास दिला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai temperature increases before october heat
First published on: 13-09-2017 at 04:40 IST