मान्सून अंदमानात पोहोचला, या वार्तेने सुखावून मुंबईकरांनी चढत्या तापमानाला निरोप देण्याची मनोमन तयारी केली असली तरी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाने उकाडय़ाची सोबत लांबवली आहे. एकीकडे मान्सूनचे आगमन लांबणीवर पडलेले असतानाच पश्चिमी वारे सोबत भरपूर बाष्प घेऊन येत असल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत.
अंदमानात वेळेआधी तीन दिवस पोहोचलेला मान्सून केरळमध्ये मात्र पाच दिवस उशिरा म्हणजे पाच जून रोजी पोहोचण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता. त्याबरहुकूम मान्सून आता बंगालच्या उपसागरात थबकला आहे. दूर दक्षिणेत होत असलेल्या या वातावरणातील बदलांमुळे राज्यातील उकाडा मात्र आणखी काही दिवस सोबतीला असेल. वाऱ्यांची दिशा पश्चिमेकडून असून समुद्रावरून मोठय़ा प्रमाणात बाष्प येत आहे. मान्सूनपूर्व ढगाळ वातावरण कायम राहील. त्यामुळे तापमानासोबतच घाम येण्याचे प्रमाणही कायम राहणार आहे. ‘मान्सूनचे वारे पोहोचण्यास विलंब असला तरी समुद्रावरून दर दिवशी बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवाह सुरूच राहील. किनारपट्टीवर सुरू असलेल्या पावसाच्या सरी तसेच राज्याच्या अंतर्गत भागात विजा चमकण्याच्या घटनाही सुरू राहतील,’ असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मान्सूनच्या प्रवाहातील बाष्पयुक्त वारे उत्तर दिशेला खेचले गेले. हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू ईशान्य दिशेकडे प्रवास करत आहे. या पट्टय़ाची तीव्रता कमी होईपर्यंत मान्सूनच्या वाऱ्यांचा पश्चिमेकडील प्रवास अडला आहे. मान्सूनच्या प्रवासात अनेकदा असे अडथळे येतात. मान्सूनच्या वाऱ्यांचा पुढचा प्रवाह किती क्षमतेचा असेल त्यावरून त्याची पुढील वाटचाल अवलंबून आहे. वेधशाळेच्या सध्याच्या अंदाजानुसार पाच जूनपर्यंत मान्सून केरळपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.