महाविद्यालये सुरू होऊन महिना उलटला नसतानाच सत्रपरीक्षा जाहीर

गेल्या वर्षीच्या निकालांचा घोळ निस्तरता निस्तरता घायकुतीला आलेल्या मुंबई विद्यापीठाला आता पुढील परीक्षांची घाई झाली आहे. विज्ञान शाखेनंतर आता कला आणि वाणिज्य शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा अवघ्या महिनाभरात घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. महाविद्यालये जेमतेम सुरू होत असतानाच परीक्षांचे वेळापत्रक हाती पडल्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक गोंधळून गेले आहेत.

निकालातील अभूतपूर्व गोंधळानंतर विद्यापीठाचे पुढील वर्षांचे नियोजन कोलमडले आहे. मुळातच लांबलेल्या निकालामुळे महाविद्यालये उशिरा सुरू झाली. मात्र शिकवण्यासाठी पुरेसा वेळ न देताच विद्यापीठाने पुढील परीक्षा घेण्याची तयारी केली आहे. कला आणि वाणिज्य शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे (एम.ए., एम.कॉम.) सत्र सुरू होण्यासाठी डिसेंबर महिना उजाडला. पहिल्या सत्राची प्रवेश प्रक्रिया ३० नोव्हेंबरला संपली. त्यानंतर एक महिन्याचा कालावधीही न देता थेट २७ डिसेंबरपासून या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

सत्र सुरू झाल्यानंतर शिकवणे सुरू होणे, वेळापत्रकाची घडी बसणे अशा सगळ्यांत जवळपास पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी जातो. त्यानंतर प्रत्यक्ष शिकवण्याची प्रक्रिया वेग घेऊ लागते. सुट्टय़ा धरून साधारण पाच ते सहा महिन्यांचा कालावधी एका सत्रात मिळणे अपेक्षित असते. मात्र हे सगळे संकेत विद्यापीठाने धुडकावले आहेत. कला आणि वाणिज्य पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे सत्र सुरू झाल्यानंतर जेमतेम दहा ते पंधराच दिवस प्रत्यक्ष अध्यापनासाठी मिळू शकणार आहेत.

यापूर्वी विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर पदवी (एमएस्सी) अभ्यासक्रमाबाबतही विद्यापीठाने हाच घोळ घातला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या रोषापायी या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. मात्र त्या वेळी कला आणि वाणिज्य शाखेबाबत विद्यापीठाने निर्णय घेतला नव्हता.

या पाश्र्वभूमीवर एम.एम. आणि एम.कॉम.च्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याबाबत विद्यापीठाला गुरुवारी निवेदन दिले. ‘‘यापूर्वीच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्याही विज्ञान शाखेपेक्षा अधिक आहे. याबाबत विद्यापीठाला निवेदन देण्याबरोबरच संबंधित शाखांच्या अधिष्ठात्यांशीही चर्चा करण्यात आली आहे,’’ असे अधिसभेचे माजी सदस्य सुधाकर तांबोळी यांनी सांगितले. याबाबत परीक्षा विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

ऑनलाइन मूल्यांकन घोटाळ्याची चौकशी

  • हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य टांगणीला लावणाऱ्या, मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन मूल्यांकन घोटाळ्याची चौकशी केली जाणार आहे.
  • त्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी विधानसभेत ही घोषणा केली.
  • चौकशी समितीचा अहवाल आल्यावर कुलगुरूसह दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.