के. जे. सोमय्या इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अॅ ण्ड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्स ही यंदा उत्कृष्ट महाविद्यालये ठरली आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट महाविद्यालये, आदर्श प्राचार्य, शिक्षक-शिक्षिका पुरस्कार प्रदान केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यापीठात शहरी भागात के. जे. सोमय्या इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअरिंग अॅसण्ड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी आणि कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्स यांना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देण्यात आला. तर ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये बी.एन.एन. महाविद्यालय भिवंडी, वीर वजेकर महाविद्यालय फुंडे आणि जे.एस.एम. महाविद्यालय अलिबाग यांना उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गौरवण्यात आले. या वर्षीपासून विद्यापीठाने आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात केली असून यंदा पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे डॉ. गणेश ठाकूर आणि मालाड येथील डी.टी.एस. महाविद्यालयाचे डॉ. मुरलीधर कुऱ्हाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार ठाण्याच्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील डॉ. मनीषा भिंगारदिवे यांना प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार ग्रामीण भागातून वसई येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्रा. राहुल जाधव यांना तर शहरी भागातून ठाण्याच्या बी. एन. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. अनिता गोस्वामी-गिरी यांना प्रदान करण्यात आला. विद्यापीठ विभागातून जैवभौतिकशास्त्र विभागाचे डॉ. प्रभाकर डोंगरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार शहरी भागात भांडुप येथील डीएव्ही महाविद्यालयाचे ग्रंथालय परिचर नंदकिशोर पाटील यांना तर मिठीबाई महाविद्यालयाचे प्रयोगशाळा साहाय्यक समीर मेहता यांना देण्यात आला. ग्रामीण भागातून रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथील अधीक्षक संजय रावराणे, विसपुते शिक्षण महाविद्यालय पनवेल येथील मुख्य लिपिक परिमला कारंजकर यांना देण्यात आला. या वर्षीच्या लघुसंशोधन प्रकल्पासाठी फादर कांसीकाओ रॉड्रीक्स तंत्रज्ञान संस्था वाशी येथील कविता शेळके, श्रेयस लाभसेटवार, संजना प्रधान, सोमय्या हरिदास या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, वित्त व लेखा अधिकारी माधवी इंगोले यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university excellent college awards given jud
First published on: 28-01-2020 at 10:30 IST