मुंबई विद्यापीठाच्या रखडलेल्या निकालांमुळे लाखो विद्यार्थी अस्वस्थ असतानाच या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या प्राध्यापकांचे उत्तरपत्रिका तपासणीसाठीचे सुमारे सव्वा कोटी रुपयेही विद्यापीठाने दिले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अनेक प्राध्यापकांना गेल्या पाच वर्षांतील पैसे मिळालेले नाहीत, तर अनेकांना मुदत संपल्यानंतर धनादेश पाठविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबई विद्यापीठाअंतर्गत सुमारे ७५० महाविद्यालये येत असून जवळपास ४४७ परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात येतात. पेपर तपासणी, मॉडरेटर आदी विविध कामांसाठी वर्षांनुवर्षे प्राध्यापकांना तुटपुंजी रक्कम देण्यात येत आहे. गेल्या वर्षीपर्यंत पेपर तपासणीसाठी बारा रुपये व मॉडरेटरला चौदा रुपये मिळत होते. यंदापासून शंभर गुणांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी सोळा रुपये व मॉडरेटरला वीस रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाढीव पैसे देण्यासाठीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात तात्काळ वाढही करण्यात आली आहे. एकीकडे निकालाचा गोंधळ सुरू असताना उत्तरपत्रिका तपासणीचे काम करणाऱ्या प्राध्यापकांनाही त्यांच्या कामाचे पैसे अनेक महिने दिले जात नसल्याचे समोर आले आहे. अर्थात त्यातही भेदभाव करण्यात येतो. काही महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीचे पैसे मिळाले, तर अनेक महाविद्यालयांतील प्राध्यापकांना पाच वर्षांपर्यंत त्यांच्या कामाचे पैसेच मिळालेले नाहीत. जवळपास साडेपाच हजार प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीचे काम दरवर्षी करत असतात. त्याचे सव्वा कोटी रुपये विद्यापीठाने थकविल्याचे ‘बुक्टू’ संघटनेचे सहसचिव प्राध्यापक चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सांगितले. अनेक प्राध्यापकांना धनादेशाची मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी धनादेश पाठविण्यात येतात, तर अनेकांनी पेपर तपासणीचा हिशेब ठेवण्याचेच आता सोडून दिल्याचे प्राध्यापक कुलकर्णी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पैशाकडे न पाहता आम्ही पेपर तपासतो असे ‘बाळासाहेब आपटे विधि महाविद्यालया’च्या प्राचार्य वैशाली गुरव यांनी सांगितले, तर पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान राखला गेला पाहिजे, असे मत न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य राजाध्यक्ष यांनी व्यक्त केले. विद्यापीठाकडे प्रशासकीय यंत्रणा पुरेशी नाही, मनुष्यबळाचा पत्ता नाही आणि लेखा विभागाकडे थकबाकीची माहितीच नसल्याचे प्राचार्य राजाध्यक्ष यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक महिन्यात आम्ही उत्तरपत्रिका तपासणीची सर्व थकबाकी प्राध्यपकांना देऊ. किती थकबाकी आहे याची माहिती या क्षणी माझ्याकडे नाही.   एम. ए. खान, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ