मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांच्या नियुक्तीसंदर्भात पत्रकार परिषदेत प्रश्नचिन्ह निर्माण केल्याबद्दल तसेच विद्यापीठातील गैरव्यवहारांवर टीका केल्याबद्दल अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांना शनिवारी विद्यापीठाने निलंबित केले. प्राध्यापकांसाठीच्या आचारसंहितेचा त्यांनी भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विद्यापाठातील दुराचाराबाबत प्रश्न करणे, हा आचारसंहितेचा भंग कसा, असा सवाल करीत या निलंबनाविरोधात राज्यपालांकडे तक्रार करण्याची तयारी काही अधिसभा सदस्य करीत आहेत.
निलंबनापूर्वी आपली बाजू मांडण्याची संधी न देता डॉ. हातेकर यांच्यासारख्या उत्तम शैक्षणिक कामगिरी असलेल्या विद्यार्थिप्रिय प्राध्यापकावर कारवाई झाल्याने विद्यापीठ वर्तुळात नाराजी आहे. डॉ. हातेकर यांचे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील काम वादातीत आहे. ते केंब्रिज विद्यापीठाचे फेलो असून १९९३पासून विद्यापीठात कार्यरत आहेत.  
व्यवस्थापन परिषदेच्या २० डिसेंबरला झालेल्या बैठकीत डॉ. हातेकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. परिषदेने घेतलेल्या निर्णयाच्या आधारे कुलगुरू डॉ. वेळुकर यांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करत त्यांना निलंबित केले. या परिषदेतही काही सदस्यांनी डॉ. हातेकर यांना बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी भूमिका मांडली होती. मात्र, काही सदस्यांनी फारच टोकाची भूमिका घेतल्याने त्यांचा नाइलाज झाला, असे सूत्रांनी सांगितले.
डॉ. हातेक77र यांनी सुरुवातीपासूनच वेळुकर यांच्या निवडप्रक्रियेविरोधात आवाज उठवला होता. कुलगुरूंच्या निवड समितीला डॉ. वेळुकर यांनी संशोधनासंबंधात खोटी माहिती पुरविल्याचे प्रकरण डॉ. हातेकर यांनीच उघडकीस आणले होते. यावरून वेळुकर इतके उघडे पडले की, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र करून त्यांना ही बाब मान्य करावी लागली. मात्र, डॉ. हातेकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे आयते कोलीतच कुलगुरूंना मिळाल्याची चर्चा आहे.
“नॅक मानांकनासाठी खोटी माहिती पुरविणे, आर्थिक गैरव्यवहार, विद्यापीठ प्राधिकरणांवरील बेकायदा नियुक्त्या आदी मुद्दे डॉ. हातेकर यांनी या पत्रकार परिषदेत मांडले होते. या निलंबनासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
आचारसंहितेचा मी भंग केलेला नाही. मी भूमिका घेतली, ती विद्यापीठाच्या भल्यासाठीच आहे. त्यासाठी मला कोणतीही किंमत चुकती करावी लागली तर त्याला माझी तयारी आहे.”
डॉ. नीरज हातेकर
मग वेळुकरांवर कारवाई का नाही?
आचारसंहितेनुसार खोटी माहिती देणे हा गुन्हा आहे. विशेष म्हणजे कुलगुरूंच्या निवड समितीला डॉ. वेळुकर यांनी संशोधनासंबंधात खोटी माहिती पुरविल्याचे उघड झाले होते. यावरून वेळुकर इतके उघडे पडले की, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे ते मान्य करावे लागले होते. मग हातेकरांचा न्याय लावून वेळुकर यांच्यावरही कारवाई का होऊ नये, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.