मुंबईकरांकडून इंटरनेटचा वाढता वापर आणि सुरक्षाविषयक सुविधांसाठीचा इंटरनेटचा उपयोग या पाश्र्वभूमीवर संपूर्ण मुंबईत मोफत ‘वायफाय’ सुविधा पुरवण्याचा विचार मुंबई महापालिकेने चालवला आहे. यासंदर्भात बुधवारी महापौरांच्या दालनात या मुद्यावर सादरीकरण करण्यात आले असून सुरुवातीला फोर्ट परिसरात तीन महिन्यांसाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे मुंबईकरांना शहरात कोठेही गेल्यास इंटरनेटचा सहज आणि मोफत वापर करणे शक्य होणार आहे.
बंगळुरूमध्ये दोन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर तीन चौरस किलोमीटर परिसरात वायफाय सुविधा देत असलेल्या डी व्हॉइस ब्रॉडबॅण्ड या खासगी कंपनीने बुधवारी महापौरांच्या दालनात सादरीकरण केले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय शहरांच्या तोडीची, आरोग्याची तसेच सुरक्षेची काळजी घेणारी मोफत वायफाय सुविधा देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. या नियमांप्रमाणे काम करण्यास तयार असलेल्या कंपनीसोबत करार करण्यात येणार असून लवकरच ही सुविधा दिली जाईल, असे महापौरांनी सांगितले. सुरुवातीला महापालिका मार्ग, हुतात्मा चौक, महात्मा गांधी मार्ग, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, मुंबई स्टॉक एक्स्चेंज परिसरात तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा दिली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात ही सेवा पुरविली जाईल. सेंसर तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावून ‘वायफाय’सोबतच वाहतूक नियमन, पार्किंग व्यवस्थापन, सुरक्षाव्यवस्था, रस्त्यावरील दिव्यांचे नियोजन, कचरा व्यवस्थापन आदी सुविधाही राबविता येतील.
‘वायफाय’ची बात काय?
* मोबाइल तसेच लॅपटॉपना मोफत इंटरनेट वापरता येईल.
* शहराच्या सर्व भागात ही सुविधा देण्यात येईल.
* प्रत्येकाला ५१२ केबीपीएस किमान स्पीड देण्याचा प्रयत्न
* वायफाय वापरण्यासाठी मोबाइल क्रमांक हा पासवर्ड असेल.