लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करत असताना चोरटय़ाने पर्स खेचण्याच्या प्रयत्नात दिलेल्या हिसक्याने  खाली पडलेल्या आरती घोलपकर (४५) या महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. घणसोली ते रबाळे स्थानकादरम्यान बुधवारी सायंकाळी आरती या लोकलमधून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती.
महापे एमआयडीसीतील एका कंपनीत काम करणाऱ्या आरती घोलपकर या डोंबिवली येथे राहणाऱ्या होत्या. बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांनी आपल्या महिला सहकाऱ्यांसह कोपरखरणे रेल्वेस्थानकातून ठाण्याकडे जाणारी लोकल पकडली. घणसोली स्थानक सुटल्यानंतर त्या लोकलच्या दाराजवळ येऊन उभ्या राहिल्या. त्याचवेळी स्थानकाजवळील खांबावर उभ्या असलेल्या एका चोरटय़ाने तीक्ष्ण हुकाने आरती यांची पर्स खेचली. अचानक बसलेल्या हिसक्यामुळे आरती यांचा तोल गेला व त्या खाली पडल्या. रबाळे स्थानकात आरती यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आरती यांना ठाण्यातील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल केले. मात्र, शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.  या घटनेला तीन दिवस लोटल्यानंतरही चोरटय़ाला पकडण्यात वाशी रेल्वे पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणी सात संशयीत आरोपींना ताब्यात घेतल्याचे वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी परशुराम कार्यकर्ते यांनी सांगितले.