पश्चिम द्रुतगती महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-टूशी जोडणाऱया सहार उन्नत मार्गाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले खरे परंतु, प्रत्यक्षात ‘टर्मिनल-टू’कडे नेणाऱया या भूयारी मार्गाजवळ कोणत्याही प्रकारची सुचना फलके लावण्यात आली नसल्याने वाहनचालकांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे येऊ ठेपलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने मते आपल्या झोळीत पाडण्यासाठी घाईघाईत घातलेला उदघाटनाचा घाट उघडकीस आल्याचीच चिन्हे आहेत.
* सुचना फलक नसल्याने वाहनचालकांची गैरसोय-
‘टर्मिनल-टू’शी जोडणाऱया पश्चिम द्रुतगती महामार्गावली भूयारी मार्गाच्या आधी कोणत्याही प्रकारचे सुचना फलक अद्याप लावण्यात आले नसल्याने चुकून भूयारी मार्गाच्या दिशेत आलेल्या वाहनचालकांवर मागे फिरावे लागण्याची नामुष्की ओढावत आहे. त्यात द्रुतगती महामार्ग असल्याने मागून येणाऱया वाहनांचा वेग लक्षात घेता वाहन मागे वळवणे कठीणच आणि तितकेच घातकही.
* मार्गिका निवडण्यातही अडचणी-
आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना टर्मिनल-टूकडे जायचे नसते तरीही सुचना फलकांच्या अभावामुळे चूकून भूयारी मार्गात जाण्याची नामुष्की ओढावते. तर, दुसऱया बाजूला ज्या वाहनचालकांना या भूयारी मार्गातून टर्मिनल-टू कडे जायचे असते त्यांना माहितीच्या अभावी योग्य मार्गिका निवडता येत नाही आणि वेळीच मार्गिका बदलावी लागते.
म्हणजे, भूयारी मार्ग द्रुतगती मार्गाच्या मधोमध सुरू होत असल्याने महामार्गाच्या डाव्याबाजूला असलेल्या वाहनांना भर महामार्गात मध्यभागी यावे लागते. त्यामुळे असे अचानक मार्गिका बदलणे कठीण आणि हेही तितकेच घातकही त्यामुळे राज्यसरकारच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाने हवाई वाहतूक करणाऱयांना टर्मिनल-टूकडे जाणे सोयीस्कर ठरणारे असले तरी, काही सुरक्षेच्या बाबींवर किंचीतसा कानाडोळा केल्याने हाच टर्मिनल-टूचा भूयारीजोड मार्ग घातक ठरण्याची लक्षणे आहेत.
(सर्व छायाचित्रे – वसंत प्रभू)
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘टर्मिनल-टू’शी जोडणारा भूयारी मार्ग धोकादायक असल्याची चिन्हे
'टर्मिनल-टू'शी जोडणारा भूयारी मार्ग घातक ठरण्याची लक्षणेपश्चिम द्रुतगती महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-टूशी जोडणाऱया सहार उन्नत मार्गाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले...
First published on: 17-02-2014 at 09:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais new airport terminal t2 underground dangerous