कळवा-मुंब्रा मतदारसंघावर दावा सांगत आपणच मुस्लिमांचे मसीहा असल्यासारखे भासविणाऱ्यांना घरी बसवा आणि मुंब्य्रातून मुस्लिम आमदारालाच निवडून द्या, असे आवाहन करत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांना नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेत एकप्रकारे इशारा दिला. इशरत जहॉ प्रकरणाचे राजकारण करायचे, टोप्या घालून उर्दुत भाषण ठोकायचे आणि आपणच मुस्लिमांचे मसीहा असल्याच्या थाटात फिरणाऱ्यांना घरी बसवा, असे आवाहन करताना आझमी यांनी आव्हाडांचा नामोल्लेख टाळला. मुस्लिमबहुल भागातून मुस्लिम समाजाचा आमदार निवडून देणार नाही, तर मग कोठून देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुस्लिमबहुल विभागातून मुस्लिम प्रतिनिधित्व मिळू शकेल. त्यामुळे मुब्रा या मुस्लिमबहुल मतदारसंघातून विधानसभेवर निवडून जाणारा आमदार हा मुस्लिम समाजाचाच असायला हवा. त्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. अमृतनगर येथील फलाह उद्यानाजवळ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी प्रदेश प्रवक्ते अब्दुल कादीर चौधरी उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मुंब््रयात येऊन मुस्लिम समाजाला आवाहन करणाऱ्या आझमी यांनी या सभेत राष्ट्रवादी कॉग्रेस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला.
पाच वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीत मुंब्य्रातून समाजवादी पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले होते. यापैकी बहुतांश नगरसेवकांना आव्हाडांनी गळाला लावत समाजवादी पक्षात उभी फूट पाडली होती़