निवडणूक खर्च आठ कोटी रुपयांवर गेल्याच्या वक्तव्यातील आकडय़ांचा विचार फारसा न करता त्यामागील संदर्भ व हेतू लक्षात घ्यायला हवा. निवडणुकीत होणारा काळ्या पैशांचा वापर रोखला जावा, यासाठी ते एक उदाहरण होते. त्याचा विपर्यास करण्यात आला किंवा त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला गेला, अशी सारवासारव ज्येष्ठ भाजप नेते आणि लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक आयोगापुढे केली आहे.
मुंडे यांच्या वक्तव्यावरून आयोगाने त्यांना नोटिस पाठविली होती. भाजपचे सर्व उमेदवार व पक्षाने एकूण १८ कोटी रुपये खर्च केला आहे. त्या संदर्भाने आठ कोटी रुपयांचा उल्लेख आपण केला. मात्र त्यामुळे माझ्या निवडणूक खर्चाचे दिलेले हिशोब चुकीचे ठरू शकत नाहीत. ते योग्यच आहेत, असा दावा मुंडे यांनी केला आहे.