मुंबई : बोरिवली पश्चिमेकडील साईबाबानगर येथील तब्बल ६,२०० चौरस फूट भूखंडावरील १२ अनधिकृत बांधकामे पालिकेच्या विभाग कार्यालयाने हटवली. हा भूखंड मनोरंजन मैदान व शैक्षणिक कारणासाठी आरक्षित करण्यात आला आहे. आता आरक्षणानुसार या भूखंडाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बोरिवली पश्चिमेकडील साईबाबानगराजवळील ६,२०० चौरस फुटांच्या पालिकेच्या भूखंडावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभी राहिली होती. त्यामध्ये चाळींप्रमाणे १२ घरांचे बांधकामही करण्यात आले होते. त्यांना पालिकेच्या आर उत्तर कार्यालयाने २०१८ मध्ये नोटीसही पाठवली होती. तसेच अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात पालिकेच्या हद्दीत अनधिकृतपणे प्रवेश केल्याचा (ट्रेस पासिंग) गुन्हाही दाखल केला होता. मात्र अतिक्रमण करणाऱ्यांनी न्यायालयात धाव घेऊन या स्थगिती मिळवली होती. न्यायालयाने हा स्थगिती आदेश उठविल्यानंतर तातडीने कारवाई करीत ही अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केल्याची माहिती आर उत्तर विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त जावेद हाफीज यांनी दिली. अनधिकृत बांधकामे हटवतानाची ही कारवाई पालिकेने पोलीस बंदोबस्ताविनाच पार पाडली. या जागेवर आता पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून तेथे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.