मुरबाड पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र तुकाराम हुलवले (४५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने नवी मुंबईतील कळंबोली येथे ५० हजार रूपयांची लाच घेताना पकडले.
तक्रारदार यांचे चुलतभाऊ एका गुन्ह्य़ात मुरबाड पोलीस ठाण्यातील कोठडीत आहेत. या कोठडीत वाढ होऊ नये व या गुन्ह्य़ाचा तपास सखोलपणे करू नये यासाठी राजेंद्र हुलवले यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रूपये रकमेची मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनुसार गुरूवारी दुपारी चार वाजता कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलसमोर लाचेची रक्कम स्वीकारताना हुलवले यांना अटक केली.
दरम्यान, गेल्या महिन्यात मुरबाड पोलीस ठाण्यातील विश्वास खोत, नंदेश्वर दळवी व वासुदेव सुरोशी या पोलिसांना पथकाने पाच हजाराची लाच घेताना पकडले होते. तत्पूर्वी टोकावडे येथे मुरबाड पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना लाच घेताना पकडण्यात आले होते.