‘माय होम इंडिया’ने पाटण्याहून मुंबईत आलेल्या ३५ मुलांना पुन्हा त्यांच्या घरी पाठवले

बाल कामगार म्हणून मुंबईत काम करणाऱ्या ३५ मुलांची ‘माय होम इंडिया’ संस्थेच्या माध्यमातून ‘घरवापसी’ झाली आहे. संस्थेचे कार्यकर्ते व पोलिसांसह वांद्रे-पाटणा अतिजलद एक्स्प्रेस या गाडीने ही सर्व मुले नुकतीच पाटण्याला रवाना झाली.
मुंबईच्या आकर्षणापोटी देशाच्या विविध भागांतून अनेक मुले घरातून पळून मुंबईला येतात. काहीजणांना फसवून येथे आणले जाते. अशी मुले येथे बाल कामगार म्हणून काम करतात. बाल कामगार म्हणून सोडवणूक केलेल्या या मुलांची रवानगी डोंगरी आणि मानखुर्द येथील सुधारगृहात केली जाते. सुधारगृहातील अशा मुलांना पुन्हा त्यांच्या घरी पाठविण्याचे काम ‘माय होम इंडिया’ ही संस्था करते आहे.
‘सपनों से अपनो तक’ या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत ६००हून अधिक मुलांची पाठवणी पुन्हा त्यांच्या घरी करण्यात आली आहे.
पाटणा येथून आलेल्या या मुलांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी वांद्रे-पाटणा अतिजलद गाडीला विशेष डबा जोडण्यात आला होता. या मुलांना निरोप देण्यासाठी संस्थेचे संस्थापक सुनील देवधर वांद्रे स्थानकावर उपस्थित होते. प्रवासादरम्यान या मुलांच्या जेवणाची व्यवस्था संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून बलसाड, जबलपूर, सतना येथील कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती.