राजकारणात येण्याआधीपासूनच मी समाजकार्यात होते. समाजकारण अधिक प्रभावीपणे करण्याचे एक माध्यम म्हणून मी राजकारणाकडे पाहते. प्रभावी राजकारणी म्हणून वडिलांचा आदर्श समोर असला तरी मला राजकारण्यांपेक्षाही असामान्य कार्य करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांक डूनच जास्त प्रेरणा मिळतात. ‘जाई-जुई विचारमंच’च्या माध्यमातून अनेक समाजसेवकांशी, विविध स्तरांवर काम करणाऱ्यांशी माझा संबंध आला आहे. कुठल्याही सरकारी मदतीविना गडचिरोलीत सामाजिक कार्य उभारणारे डॉ. अभय-राणी बंग, ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स’ या संस्थेच्या माध्यमातून संशोधन कार्य करणारे युवक अशा प्रत्यक्ष सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या लोकांकडून मला समाजकारणासाठी जास्त प्रेरणा मिळते, असे स्पष्ट मत आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडले आणि राजकीय वातावरणात वाढलेल्या प्रणितीच्या विचारांची धाव राजकारणापलीकडची आहे हे लक्षात येताच तिला प्रेक्षकांकडून दिलखुलास पसंतीची दाद मिळाली.
‘लोकसत्ता’ आयोजित, ‘केसरी’ प्रस्तुत ‘व्हिवा लाऊंज’च्या नव्या पर्वात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सक्रिय असलेल्या तरुण आमदारांच्या फळीतील आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी संवाद साधण्याची संधी वाचकांना मिळाली. ‘लोकसत्ता’चे संदीप आचार्य याणि रोहन टिल्लू यांनी प्रणिती शिंदे यांच्याशी संवाद साधला. या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या असलेल्या प्रणिती एक व्यक्ती म्हणून कशा आहेत, एक तरुण आमदार आणि राजकारणी म्हणून असलेले त्यांचे विचार आणि कार्यपद्धती यांच्याविषयी सर्वतोपरी माहिती जाणून घेण्याची एकही संधी प्रेक्षकांनी सोडली नाही. वडिलांच्या परंपरागत सोलापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या प्रणिती शिंदे यांचा प्रवास मात्र मुंबई ते सोलापूर असा आहे. त्यामुळे आमदार म्हणून सोलापूरशी जोडले गेलेले नाते, तिथल्या समस्या आणि त्यांच्यावरच्या उपाययोजना, विकासकामे अशा अनेक प्रश्नांना प्रणिती यांनी अत्यंत संयतपणे उत्तरे दिली.
सध्या विधानसभेत असलेले सर्वपक्षीय तरुण आमदार विकासाची कास धरणारे आहेत. त्यासाठी आम्ही एकत्र येत प्रसंगी संबंधित मंत्र्यांना निर्णय घेण्यास भाग पाडत असतो. त्याचप्रमाणे विविध प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे आणि प्रभावीपणे काम करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत एखादा मंच वगैरे स्थापन करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले. आपल्या वडिलांकडून आपण अनेक चांगले गुण घेतले असले, तरीही सर्वाशी चांगले वागण्याच्या नादात अनेकदा त्यांची फसवणूक होते. वडिलांचा हा दोष आपण आपल्या राजकीय वाटचालीत टाळणार आहोत, असेही प्रणिती यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले. आमदार म्हणून काम करीत असताना सोलापूरमध्ये सुरू असलेल्या विकासकामांपासून ते नक्षलवाद, महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यासंबंधीचे कायदे, निवडणुकीच्या वेळी होणारी पक्षीय बंडखोरी, कार्यकर्त्यांची बॅनरबाजी आणि मतदारसंघात काम करताना येणारे अनुभव अशा अनेक विषयांवर प्रणिती यांनी थेट आणि मनमोकळी मते मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आईवडिलांकडून साधेपणा शिकले
घरात लहानपणापासूनच राजकीय वातावरण, लाल दिव्यांच्या गाडय़ा, सरकारी अदब या गोष्टी पाहिल्या असल्याने त्याचे आकर्षण नव्हते. उलट आई-वडिलांनी जाणीवपूर्वक आम्हाला सर्वसामान्यांसारखे राहायला, वागायला शिकवले. शाळेत किंवा महाविद्यालयातही आम्ही सुशीलकुमार शिंदे यांच्या मुली आहोत, याची कोणाला माहिती देण्यात आली नव्हती. आम्ही नेहमीच शाळेत जाताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर केला आहे. आपले वडील हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत म्हणून आम्हा तिघा बहिणींना कधीही खास वागणूक देण्यात आली नाही. त्यामुळे आमची जडणघडण ही पारंपरिक राजकारणी विचारात झालेली नाही, असे स्पष्ट करतानाच प्रणिती यांनी यासाठी आपल्या वडिलांचे आभारच मानले. त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या या जडणघडणीमुळे आपल्याला आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाल्याचेही त्यांनी कबूल केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My inspiration is above then the politics praniti shinde
First published on: 10-05-2013 at 05:42 IST