दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून उद्धव व जयदेव या दोघा बंधूंमध्ये सध्या उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू आहे. मात्र या प्रकरणी आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांची प्रत मागण्यासाठी एक अज्ञात व्यक्ती आपल्या दालनामध्ये येत असल्याचे आणि वकिलांचे नाव सांगून ती घेऊन जात असल्याची बाब या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या न्यायमूर्तीनी बुधवारी उघड केली. तसेच ही बाब धक्कादायक असल्याचेही म्हटले.
न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर बाळासाहेबांच्या मृत्युपत्राबाबत ठाकरे बंधूंनी परस्पराविरोधी केलेल्या दाव्यांची सुनावणी सुरू आहे.
बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांची प्रत मागण्यासाठी एक अज्ञात व्यक्ती आपल्या दालनात सतत येत असल्याचे न्यायालयाने उद्धव व जयदेव यांच्या वकिलांना सांगितले. चार वेळा ही व्यक्ती आपल्या दालनात आली. आपला कर्मचारी वर्गही त्यामुळे त्रस्त आहे. ही व्यक्ती आपण जयदेव यांच्या वकिलांच्या कार्यालयातून आल्याचे सांगत साक्षीपुराव्यांची प्रत देण्याची विनंती करते. ही व्यक्ती नेमकी कशासाठी ही प्रत मागते आणि ती मागण्यामागील तिचा हेतू काय हे आपल्याला माहीत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यावर साक्षीपुराव्यांची प्रत हवी असल्यास आपण तसे पत्र सहाय्यकासोबत पाठवत असल्याचे उद्धव व जयदेवच्या वकिलांकडून न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच सहाय्यक वकिलांनी त्यांचे ओळखपत्र दाखवल्यानंतरच त्यांना साक्षीपुराव्यांची प्रत उपलब्ध केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही वकिलांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर न्यायालयाने सर्व प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त करत हे संपवून टाकायला हवे, असे म्हटले.
दरम्यान, ३० जून रोजी प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असून शिवसेना नेते आणि बाळासाहेबांच्या मृत्युपत्राचे साक्षीदार असलेल्या अनिल परब यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.