कोकणात जाणाऱ्या रेल्वेमार्गावर मध्य रेल्वेच्या हद्दीत दुपदरीकरणाचे काम पूर्ण होत आले असले, तरी आता त्या कामात न्यायालयीन लढय़ाचा अडथळा आला आहे. पनवेल-रोहा या मार्गावर मध्य रेल्वेने पनवेल-पेण, पेण-कासू आणि कासू-नागोठणे अशा तीन टप्प्यांत काम पूर्ण केले आहे. आता नागोठणे-रोहा या टप्प्यात रोह्य़ाजवळील एका गावातील १६ बांधकामे पाडण्याची गरज आहे. रेल्वेच्या हद्दीतील या बांधकामाच्या मालकांनी जिल्हा सत्र न्यायालयांमध्ये धाव घेत रेल्वेच्या कामास स्थगिती आणली आहे. रेल्वेने या स्थगितीला उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, ५ जुलैस याबाबतची सुनावणी होणार आहे.

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुपदरीकरणाचा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील काम पूर्ण करत आणले असले, तरी अद्याप कोकण रेल्वेने या कामाला सुरुवात केलेली नाही. मध्य रेल्वेवर पनवेल-रोहा दरम्यानच्या मार्गावर पनवेल ते नागोठणे हे काम पूर्ण झाले आहे. हे काम पनवेल-पेण, पेण-कासू, कासू-नागोठणे आणि नागोठणे-रोहा या चार टप्प्यांत नियोजित होते. यातील पहिल्या टप्प्यासाठी २६८ कोटी रुपये आणि उर्वरित तीन टप्प्यांसाठी ३१२ कोटी रुपये निधी उपलब्ध आहे.

नागोठणे-रोहा या १३ किलोमीटरच्या अंतरातील आठ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित पाच किलोमीटरच्या कामांसाठी अडचण उद्भवली आहे. रोह्य़ाजवळील खारपट्टी या गावातील १६ पक्की बांधकामे या कामाच्या आड येत आहेत. रेल्वेने ही बांधकामे पाडण्याचे काम हाती घेतल्यानंतर संबंधित रहिवाशांनी माणगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. जिल्हा सत्र न्यायलयानेही रेल्वेच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.