scorecardresearch

मुंबई: BJP च्या आंदोलनाचा मुंबईकरांना फटका; बेस्ट बसची हवा काढून वाहतूक कोंडी केल्याने प्रवाशांचा संताप

हिंमत असेल तर इतर वाहनांची हवा काढा, असं आव्हान देत सर्वसामान्य प्रवास करतात त्या बेस्ट बसलाच का लक्ष्य करण्यात आलं, असं महिला प्रवाशांनी विचारलंय.

Malad Protest
पक्षाचे कार्यकर्ते येऊन हवा काढून गेल्याचा कंडक्टरचा दावा

मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन मुंबईतील राजकारण चांगलच तापलं आहे. आज या संकुलाबाहेर भाजपा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. भाजपा आणि बजरंग दलाकडून या नामकरणाला विरोध करण्यात येत आहे. देशात एपीजे अब्दुल कलामसारखे लोक होऊन गेलेत, त्यांचं नाव द्या पण टिपू सुलतान यांचं नाव देण्यात येऊ नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. मात्र या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेला नुकसानही पोहचवलं. काही ठिकाणी वाहनांची हवा काढून टाकत वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आला.

बेस्टच्या २७२ क्रमांकाच्या मार्गावरील मालाड पूर्वेतील मार्वे चौपाटी येथे जाणाऱ्या बसची हवा काढण्यात आली. हवा काढली तेव्हा बसमध्ये १०० च्या आसपास प्रवासी होते असा दावा बसच्या कंडक्टरने केलाय. मागून येऊन काही जणांनी बसच्या चाकांची हवा काढली. असा सर्वसामान्यांना का त्रास दिला जातोय?, हे कशासाठी केलं असा संतप्त सवाल या बसच्या कंडक्टरने प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय.

तीन ते चार लोक आरडाओरड करत आले आणि त्यांनी बसच्या चाकाची हवा काढली असं बसच्या चालकाने म्हटलंय. बेस्ट बसचं नुकसान का करण्यात आलं, असा प्रश्न बसच्या चालक आणि कंडक्टरने विचारलाय. “चार पाच लोक आले आणि गाडीची हवा काढून गेले. तुमचा पक्ष आहे तर त्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आंदोलन करा ना. लोकांना का त्रास देताय. पक्षाच्या लोकांनीच हवा काढलीय,” असं बसच्या कंडक्टरने म्हटलं आहे.

याचप्रमाणे बसमधील महिला प्रवाशांनाही यासंदर्भात संताप व्यक्त केलाय. हिंमत असेल तर इतर वाहनांची हवा काढा, असं आव्हान देत सर्वसामान्य प्रवास करतात त्या बेस्ट बसलाच का लक्ष्य करण्यात आलं असा प्रश्न महिला प्रवाशांनी विचारला आहे. आम्ही पहाटे पाच वाजता कामाला गेले होतो, आता घरी परतताना हा नाहक त्रास आम्ही का सहन करायचा, असंही या महिलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना विचारलं.

काही ट्रक चालकांनाही गाडीची हवा काढण्याचा प्रयत्न काही लोकांकडून करण्यात आल्याचा दवा प्रसारमाध्यमांसमोर केलाय. गाडी थांबली असताना काही जण हवा काढू लागले तेव्हा चालक खाली उतरला असता हवा काढणारे लोक पळून गेले असं एका ट्रकचा क्लिनर म्हणालाय.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Naming of sports complex in malad after tipu sultan on republic day bjp protest best bus attacked scsg

ताज्या बातम्या