“पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात ‘हायटेक कॉपी’ करण्यात आली. कमी गुण असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले. याशिवाय भरतीसाठी मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेण्यात आल्याच्या असंख्य तक्रारी आहेत,” असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून पोलीस भरती प्रक्रिया स्थगित करावी व नव्याने पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्यावी अशी मागणी केली.

पोलीस भरती प्रक्रियेतील घोटाळ्यासंदर्भात राज्यातील विविध भागातून आलेल्या मुला-मुलींनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पक्षकार्यालय टिळक भवन येथे भेट घेतली. तसेच या परीक्षेत झालेल्या घोटाळ्याबाबत माहिती दिली. यानंतर नाना पटोले यांनी पोलीस महासंचालकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि सर्व प्रकार त्यांना सांगितला. तसेच कारवाई करण्याची मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र पाठवले आहे.

“भरती होण्यासाठी मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेतले”

या पत्रात नाना पटोले म्हणाले, “पोलीस भरती प्रक्रियेत जास्त गुण असलेल्यांना वगळून कमी गुण मिळालेल्या मुलांना भरती करून घेण्यात आले. शारीरिक चाचणीमध्येही पैसे घेऊन गुण वाढवण्यात आले. शारीरिक चाचणीत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. पोलीस दलात भरती होण्यासाठी काही मुलांकडून १५-१५ लाख रुपये घेण्यात आले.”

“पोलीस भरतीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा”

“या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. पात्र विद्यार्थ्यांना वंचित ठेवून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेल्यांना पोलीस दलात भरती करण्यात आले. अशा प्रकारच्या तक्रारी या भरती प्रक्रियेतील मुला-मुलांनी आमच्याकडे केल्या आहेत. पोलीस दलात अशा प्रकारे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून भरती केल्याच्या ज्या तक्रारी येत आहेत त्या गंभीर आहेत,” असं नाना पटोलेंनी म्हटलं.

हेही वाचा : नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भरती स्थगित करुन परीक्षा पुन्हा पारदर्शक पद्धतीने घ्यावी”

“या पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी आणि त्यात जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करावी. मुला-मुलींच्या तक्रारी पाहता पोलीस भरती प्रक्रियाच संशयास्पद वाटत आहे. म्हणून मुंबईत पार पडलेली पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करुन परीक्षा पुन्हा पारदर्शक पद्धतीने घ्यावी,” अशी मागणी नाना पटोलेंनी केली.