लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर बोलताना नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकांतील पराभवासाठी काँग्रेस पक्षातील नेते जबाबदार असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. याबद्दल बोलतान नारायण राणे यांनी निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या असहकारामुळे झाल्याचे सांगितले. विशेषत: कोकणात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे सिंधुदूर्ग-रत्नागिरी मतदारसंघात डॉ. निलेश राणे यांचा पराभव झाल्याचा ठपका नारायण राणेंनी ठेवला आहे. मात्र, बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा अधिक तपशील पत्रकारांना देण्यास राणेंनी नकार दिला. तसेच लोकसभा निवडणुकांतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.