गेली २२ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर सत्तेवर असूनही शहराची प्रगती सोडा पण, मुंबईचा बट्ट्याबोळ शिवसेनेने करून ठेवल्याचा घणाघाण करत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुंबई महापालिका हे शिवसेनेच्या उदरनिर्वाहाचे साधन हे महापौरांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे सिद्ध झाल्याची खरमरीत टीका यावेळी राणेंनी केली. या स्टिंगमधून शिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याचे राणे म्हणाले. वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे उमेदवार नारायण राणे हे सध्या मतदारसंघात घरोघरी प्रचार करीत आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, ज्या शहराचे महापौरच टक्केवारीची भाषा करत असतील तेथे विकास कसा होणार? या सर्वांनी टक्केवारीतून स्वत:च्या तुंबड्या भरून घेतल्या. तसेच बाळासाहेबांनी या पक्षाला कष्टाने वाढवले मात्र आता या पक्षात पैसे देऊन तिकीटे दिली जातात. जेथे उमेदवारांनाच तिकीटासाठी पैसे मोजावे लागतात त्यांच्याकडून सामाजिक कामाची काय अपेक्षा ठेवणार? असे म्हणत शिवसेना आता सामाजिक काम करणारा पक्ष राहिलेला नसल्याचाही आरोप राणेंनी केला. मी केलेला दावा खोटा आहे असे शिवसेनेने सांगावे मी लगेच ५० लोकांची यादी जाहीर करतो, असे आवाहनही राणेंनी यावेळी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane critics on uddhav thackeray
First published on: 01-04-2015 at 04:28 IST