भाजपच्या वाटेवर असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेसने चार हात दूरच ठेवणे पसंत केले आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांच्या मराठवाडा दौऱ्यात राणे यांना महत्त्वच देण्यात आले नव्हते. राज्यातील सारे नेते उपस्थित असताना राणे यांनी मात्र या दौऱ्याकडे पाठ फिरविली.

नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार हे निश्चित झाल्याने काँग्रेसने त्यांना अलीकडे बैठकांना निमंत्रण पाठविणे बंद केले आहे. राणे यांच्याशी मध्यंतरी चर्चा करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता, पण राणे त्याला प्रतिसाद देत नसल्याने काँग्रेसने राणे यांच्याशी फार काही संबंध ठेवलेला नाही. काँग्रेसचे दिल्ली तसेच राज्यातील नेते राणे यांची दखलही घेत नाहीत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राणे यांनी काँग्रेसला काही मुद्दय़ांवर वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून काँग्रेस नेत्यांनी राणे यांना महत्त्व देण्याचे टाळले आहे.

राहुल गांधी यांच्या मराठवाडा दौऱ्यात सारे नेते उपस्थित होते. पण राणे फिरकले नाहीत. राणे हे सध्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असून, तेथे त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीकरिता बैठकीला हजेरी लावली. मराठवाडा दौऱ्याकरिता आपल्याला पक्षाने निमंत्रणच देण्यात आले नव्हते, असे राणे यांनी स्पष्ट केले.

गेल्या एप्रिल महिन्यात राणे यांनी राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली होती. राणे यांनी आपली परखड मते या वेळी मांडली होती. त्याची साधी दखलही घेण्यात आली नाही यामुळे राणे नाराज झाले होते.भाजप प्रवेशासाठी राणे यांना सध्या ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी वेळ आली आहे.

परिणामांची तयारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राणे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यास काँग्रेसला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागू शकते. पुत्र नीतेश आणि कालिदास कोळंबकर हे दोन आमदार राणे यांच्याबरोबर आहेत. या दोघांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तरच काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकते. दोघेही तांत्रिकदृष्टय़ा काँग्रेसचे आमदार राहिल्यास पक्षाकडील विरोधी पक्षनेतेपद कायम राहू शकते. सध्या विधानसभेत काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार आहेत.