अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत. संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत.  शरद कळसकरच्या जबाबानंतर दोघांना अटक करण्यात आली. दोघांनाही उद्या सुट्टीकालीन कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजीव पुनाळेकर मुंबई उच्च न्यायालयात वकील असून हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.

अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यासारख्या अनिष्ट रुढी परंपरांविरुद्ध लढणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. राज्य पोलीस आणि सीबीआयचे पथक या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते.

पाच वर्ष या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नव्हती. मागच्यावर्षी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली होती. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत. एटीएसने औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra dabholkar murder case cbi arrest two accused from mumbai
First published on: 25-05-2019 at 18:44 IST