मुंबईवरील ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलेले मुंबईतील ‘नरिमन हाऊस’ (छाबड हाऊस) मंगळवारी पुन्हा गजबजले. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नरिमन हाऊसवरही दहशतवाद्यांनी हल्ला चढविला होता. मात्र सहा वर्षांनंतर नरिमन हाऊस पुन्हा सुरु झाले. या इमारतीमध्ये प्रामुख्याने इस्त्रायली नागरिक राहात होते.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात असलेल्या ‘नरिमन हाऊस’चाही समावेश होता. दहशतवाद्यांनी या इमारतीत घुसून सहा रहिवाशांचा बळी घेतला होता. तसेच या हल्ल्यात इमारतीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान आणि पडझड झाली होती. दहशतवादी हल्ल्यात ‘मोश’ या दोन वर्षांच्या लहान मुलाला वाचविण्यात आले होते मात्र त्याचे आई आणि वडील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ठार झाले होते. हे दोघेही जण मुंबई आणि परिसरातील ज्यू नागरिकांबाबत अभ्यास करण्यासाठी २००३ मध्ये मुंबईत आले होते. हल्ल्यात वाचलेल्या छोटय़ा मोशला त्याचे आजी-आजोबा त्याला इस्त्रायल ला घेऊन गेले होते. या कार्यक्रमासाठी थायलंड, सिंगापूर, हॉंगकॉंग येथून इस्त्रायली नागरिक उपस्थित होते. जमलेल्या प्रत्येकाच्या मनात सहा वर्षांपूर्वीच्या कटू आठवणी जाग्या झाल्या होत्या. पण नरिमन हाऊस सुरु होणे, हेच आमच्यासाठी मोठे समाधान आहे. प्रेम आणि शांततेचा प्रसार करून आम्ही दहशवादाशी सामना करू, असा विश्वास या वेळी उपस्थितानी व्यक्त केला.