नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजपा नेते अद्वय हिरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांना शिवबंधन बांधलं. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत उपस्थित होते. तेव्हा बोलताना अद्वय हिरे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
“२००९ साली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभेची जागा निवडून देण्याची विनंती केली. तेव्हापासून मी भाजपाबरोबर काम करत आहे. भाजपामध्ये गेल्यावर सर्वजण पक्ष सोडून गेले होते. देशात सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याची लाट होती. अशा परिस्थितीत मंत्र्याला लोकसभेत पाडून भाजपाचा उमेदवार निवडून आणला. सरपंच, जिल्हा परिषदमध्ये भाजपाची सत्ता आणली. पण, आता ५० गद्दार भाजपाच्या मांडीवर बसल्यापासून त्यांना आमची गरज राहिली नाही,” असा हल्लाबोल अद्वय हिरे यांनी केला.
हेही वाचा : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे भाकित; म्हणाले, “महाविकास आघाडीने ४ किंवा ६ जागा…”
“कोणत्याही व्यक्तीगत पदासाठी भाजपाकडे मागणी केली नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली, तेव्हा आंदोलन केलं. पण, भाजपा सरकारने शेतकऱ्याला मरू दिलं. त्यामुळे भाजपाचा त्याग केला,” असं अद्वय हिरे यांनी सांगितलं.
“कालपासून भाजपाला माझी अचानक आठवण आली. प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांचे फोन आलं. त्यांना स्पष्टपणे म्हटलं की कितीही खोके, कितीही सत्ता दिली तरी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द मोडणार नाही. पैसा आणि सत्तेसाठी बाप बदलणारी अवलाद माझी नाही. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना पक्ष उभा राहण्यासाठी काम करु. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरेंना बसल्याशिवाय राहणार नाही,” असेही अद्वय हिरे म्हणाले.
हेही वाचा : “कितीही बाजारबुणगे शिवसेनेतून गेले तरी…” भाजपा नेते अद्वय हिरेंच्या प्रवेशाच्यावेळी संजय राऊत यांचा टोला
“शिवसेना सोडून लोकं निघून जात असल्याचा गैरसमज आहे. गेलेल्या गद्दारांना जनता धडा शिकवणार आहे. मी बाहेर पडलोय, ४९ मतदासंघातील भाजपाचे नेते बाहेर पडण्यासाठी थांबले आहेत. तिथे त्यांची कुचंबना होत आहे. निवडणूका जाहीर झाल्यावर ४९ मतदारसंघातून हे लोक शिवसेनेत प्रवेश करतील,” असा दावा अद्वय हिरे यांनी केला.